दगड खाणींतील स्फोटांमुळे हादरे
esakal April 02, 2025 01:45 AM

54865
54866
सोनुर्ली ः परिसरात अशाप्रकारे दगड खाणी असून तेथे स्फोट घडवून उत्खनन केले जाते. दुसऱ्या छायाचित्रात खाणींमध्ये स्फोट केल्याने नजिकच्या काजू बागायतीत येऊन पडलेले भलेमोठे दगड.


दगड खाणींतील स्फोटांमुळे हादरे

सोनुर्लीवासीय संतप्त; कारवाई न केल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः सोनुर्ली येथील दगड खाणी नागरिकांसाठी धोकादायक बनल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त स्फोट केल्याने उडालेले दगड नजीकच्या शेती, बागायतीत जाऊन पडत आहेत. या स्फोटांमुळे परिसर हादरुन निघत आहेत. प्रशासनाने अशा खाणींवर त्वरित कारवाई न केल्यास प्रसंगी कायदा हातात घ्यावा, लागेल असा इशारा उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे.
सोनुर्ली, वेत्ये व इन्सुली गावामध्ये मोठ्या प्रमाणात दगड खाणी आणि क्रशर उभारण्यात आले आहेत. महसूलच्या वरदहस्ताखाली नियम धाब्यावर बसवून ते सुरू आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी चुकीच्या कामाविरोधात महसूलचे लक्ष वेधले आहे. मात्र, खनीकर्म विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. एकूणच सर्वकाही आलबेल असून ग्रामस्थांच्या जीविताशी या ठिकाणी खेळ सुरू असल्याचा आरोप उपसरपंच गावकर यांनी केला आहे.
त्यांच्या मते, आज दुपारी ठरलेल्या टाइमिंगवर सोनुर्लीतील येथील दगड खाणीमध्ये क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात स्फोट करण्यात आला. यावेळी नजीकचा परिसर हादरून गेला. स्फोटामुळे उडालेले दगड आजूबाजूच्या काजू बागायती, शेतीमध्ये पडले. सद्यस्थितीत काजीचा हंगाम सुरू असताना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काजू बागायतीमध्ये शेतकरी दिवसभर काम करत असतात. अशाच शेतकऱ्यांच्या बाजूला खाणीतील दगड येऊन पडले. सुदैवाने शेतकरी यापासून बचावले. त्यामुळे महसूल विभागाने दगड खाणी मालकांच्या मनमानी कारभाराकडे वेळीच लक्ष द्यावे आणि संबंधित खाण मालकावर त्वरित कारवाई करावी; अन्यथा शेतकरी- बागायतदारांना एकत्र करून आंदोलनासारखी भूमिका हाती घ्यावी लागेल. सद्यस्थितीत त्या ठिकाणी खाणीतील उडणारी धूळ काजू बागायतींवर बसून मोठ्या प्रमाणात बागायतदारांचे नुकसान झाले आहे तसेच पावसाळ्यामध्ये दगड खाणीतील माती वाहून शेतकऱ्यांच्या शेतजमनीत जाऊन नुकसान झाले आहे. याकडेही संबंधित खाण क्रेशर मालक डोळेझाक करत आहेत. एकूणच महसूलने या सर्वांवर तोडगा काढावा, अशी मागणीही उपसरपंच गावकर यांनी केली आहे.
----------------
कोट
सोनुर्ली येथील दगड खाणीवर झालेला प्रकार आणि घटनेची माहिती मंडल अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ घेण्यात येईल. नियमाच्या बाहेर उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
- श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.