गुंडगे येथील महिलांचे साखळी उपोषण
पाणीटंचाईमुळे आंदोलनाचा पवित्रा; प्रशासनाकडे विविध मागण्या सादर
कर्जत, ता. १ (बातमीदार) ः गुंडगे येथे पाण्याच्या प्रश्नासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या महिलांनी १ एप्रिलपासून छत्रपती शाहू महाराज चौक, गुंडगे येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये पाणी सोडण्याची सकाळची वेळ निश्चित करावी, जादा दाबाने व अधिक वेळ पाणीपुरवठा करण्याची हमी द्यावी, पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवाव्यात आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात महिलांनी आवाज उठवला आहे. मागील १८ आणि २४ मार्च रोजी पत्रव्यवहार करून प्रशासनाला समस्या कळवण्यात आल्या होत्या, मात्र २९ मार्चला मिळालेल्या उत्तरात केवळ एका मागणीवर कार्यवाही करण्यात आली. उर्वरित तीन मागण्यांवर कोणताही निर्णय न झाल्याने महिलांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळच्या वेळेत नियमित पाणीपुरवठा होत होता, परंतु कर्जत नगर परिषदेने कोणतीही सूचना न देता अचानक वेळेत बदल केला. यामुळे महिलांना दिवसभर पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते, परिणामी त्यांचे इतर कामांवर परिणाम होत आहे. कमी दाबाने व कमी वेळ मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा अखेर निर्णय घेतला. गुंडगे गावातील तसेच संत रोहिदास नगर, पंचशील नगर आणि ठाकूरवाडी भागातील काही महिलांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांकडून पाणीकर वसूल करते, मात्र त्याला साजेसा पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांनी लढ्याची भूमिका घेतली आहे.
....................................
कर्जत नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. गुंडगे गावातील महिलांनी त्यांच्या स्वागताला आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांसह शहरातील इतर समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. महिलांचे हे आंदोलन पाणीपुरवठ्याच्या स्थायी तोडग्यासाठी निर्णायक ठरेल का, हे येणारा काळच ठरवेल.