नवीन बांधकामाला परवानगी देवू नये
esakal April 02, 2025 02:45 AM

खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघरवासीयांना दैनंदिन जवळपास ३० टक्के पाण्याची कमतरता भासत आह, शिवाय तळोजा वसाहतीलाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकाम क्षेत्रात (सीसी) पूर्णत्व प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशा मागणीचे पत्र खारघर हौसिंग फेडरेशनने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दररोज जवळपास ३० टक्के पाण्याची कमतरता भासत आहे. त्यात पुढील काही दिवसांत नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असून, त्या ठिकाणी पाच दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे खारघर आणि तळोजासाठी पुन्हा कमी पाणीपुरवठा होण्याची भीती आहे. खारघर तसेच तळोजा शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. सिडकोने जनतेचे हित लक्षात घेऊन आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परिसरातील नवीन बांधकाम क्षेत्रात पूर्णत्व प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, असे पत्र खारघर हौसिंग फेडरेशनने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे.
--------------
१८ दशलक्ष लिटरची कमतरता
खारघर शहराला ८० दशलक्ष लिटर; तर तळोजा शहराला दैनंदिन २० दशलक्ष लिटर, असे एकूण १०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. असे असताना सद्यःस्थितीत हेटवणे धरणातून ६७ दशलक्ष लिटर, नवी मुंबई महापालिकेकडून १० दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून पाच दशलक्ष लिटर, असे केवळ ८२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. म्हणजे दैनंदिन १८ दशलक्ष लिटरची पाण्याची कमतरता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.