पुणे, ता. १ : कला दर्पण आर्ट कल्चरल ॲण्ड सोशल फाउंडेशनतर्फे ४ एप्रिलपर्यंत विद्यार्थी व कलाशिक्षक यांचे चित्रकला प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनात फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरती चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रदर्शनात १६३७ विद्यार्थ्यांची चित्रे मांडली आहेत. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत असणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी घोडके यांनी दिली.
हिंदू नववर्ष स्वागतासाठी मिरवणूक
पुणे, ता. ३१ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे पुणे येथे कसबा गणपती मंदिर ते सारसबाग अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीत जिवंत देखावे साकारण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, समाज प्रबोधन करणारे देखावे आणि संदेश फलकांचाही समावेश होता. तसेच मिरवणुकीत पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख, भगवेध्वज, कलश, ढोल-ताशा पथक आणि गुरुनामाचा गजर झाला.