पूर्व क्षितीजावर दिसतील चार ग्रह
esakal April 02, 2025 02:45 AM

- डॉ. प्रकाश तुपे

एप्रिल महिन्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितीजावर चार ग्रह दिसतील. गेल्या महिन्यात संध्याकाळी आकाशात दिसलेल्या सहा ग्रहांपैकी शुक्र, बुध, शनी व नेपच्यून हे चार ग्रह पूर्व क्षितीजालगत दिसू लागतील. या चौघांपैकी तेजस्वी शुक्र सूर्योदयापूर्वी जवळजवळ तासभर पूर्वेस दिसेल. साधारणपणे दोन आठवड्यानंतर बुध व शनी क्षितीजालगत दिसू लागतील. या दोन ग्रहांची देखणी युती १० एप्रिल रोजी होईल. मात्र ती पाहण्यासाठी बॉयनॉक्युलरची गरज भासेल. एप्रिलमध्ये शुक्र, बुध व शनी यांचा छानसा त्रिकोण तयार होत असून या परिसरात २६ एप्रिल रोजी चंद्रकोर दाखल होत आहे. मंद तेजाचा पिवळसर शनी शुक्राकडे सरकत असून त्याची युती २९ तारखेला होईल. फक्त दुर्बिणीतून दिसू शकणारा नेपच्यून सूर्योदयापूर्वी तासभर पूर्व क्षितीजावर पाहता येईल.
या महिन्यात संध्याकाळी उत्तर पश्चिमेस गुरू व त्याच्या वरच्या बाजूस मिथुन राशीत मंद तेजाचा मंगळ दिसेल.

ग्रह
बुध : नुकतीच बुधाची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर तो सूर्यापासून दूर होत पूर्व क्षितीजावर पोहचला आहे. मात्र सूर्याजवळ असल्याने महिन्याच्या पूर्वार्धात तो दिसू शकणार नाही. तेजस्वी शुक्राच्या खालच्या बाजूस क्षितीजालगत शनी व बुधाची जोडी दिसू शकेल. दहा एप्रिल रोजी शनी व बुध एकमेकांपासून अवघ्या २.१ अंशावर पोहोचतील. यावेळी बुध काहीसा तेजस्वी म्हणजे ०.६ तेजस्वितेचा तर शनी मंद म्हणजे १. २ तेजस्वितेचा दिसेल. संधी प्रकाशातच ही युती होत असल्याने सहजपणे डोळ्याने दिसू शकणार नाही. बुध सूर्यापासून दूर होत २२ एप्रिल रोजी दूरात दूर अशा २७ अंशावर पोहोचेल. यावेळी तो पाचच्या सुमारास उगवत असून त्याची तेजस्विता ०.४ असेल.

शुक्र : गेल्या महिन्याच्या अखेरीस शुक्राची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर शुक्र पूर्व क्षितीजावर दाखल झाला असून सूर्योदयापूर्वी तासभर तो दिसू लागेल. महिन्याच्या प्रारंभी शुक्राचे ५७ विकलांचे बिंब अवघे ४ टक्के प्रकाशित दिसेल. जसजसा शुक्र सूर्यापासून दूर होत जाईल तसतसे शुक्राचे रूप बदलताना दिसेल. महिन्याच्या मध्यात शुक्राचे ४७ विकलांचे बिंब १५ टक्के प्रकाशित दिसेल. या महिन्यात बिंबाचा आकार ५७ विकलांपासून ३७ विकलांएवढा छोटा होत २८ टक्के प्रकाशित दिसू लागेल. शुक्राची तेजस्विता २७ एप्रिल रोजी जास्तीत जास्त म्हणजे ४.७ एवढी असेल. शुक्राजवळ शनी व त्यांच्या खालच्या बाजूस क्षितीजाजवळ बुध दिसेल. शुक्राच्या बिंबाचा छोटा होत जाणारा आकार व कोरीचा बदलता प्रकाशित भाग पाहण्यासाठी बॉयनॉक्युलर किंवा दुर्बिणीची गरज भासेल. चंद्रकोरीजवळ शुक्र २५ एप्रिल रोजी दिसेल.

मंगळ : सूर्यास्तानंतर दक्षिण आकाशातील मिथुन राशीच्या परिसरात नारिंगी रंगाचा मंगळ दिसेल. महिन्याच्या प्रारंभी तो प्लव (पोलक्स) ताऱ्याजवळ दिसेल व मध्यरात्री दोन वाजता मावळेल. मंगळ कर्क राशीकडे सरकत असून ९-१० तारखेला तो कश व प्लव ताऱ्यांच्या ओळीत दिसू लागेल व १२ तारखेला कर्केत प्रवेश करेल. तो पुष्य किंवा एम- ४४ तारकागुच्छचा दिशेने सरकत असून पुढील महिन्याच्या प्रारंभी या तारकागुच्छाच्या परिसरात प्रवेश करेल. मंगळाचे बिंब या महिन्यात फारच छोटे म्हणजे ७ विकलांचे दिसेल तर त्याची तेजस्विता ०.५ असेल. चंद्राजवळ मंगळ ५ एप्रिल रोजी दिसेल.

गुरू : तेजस्वी गुरू पुढील काही महिन्यांत सूर्याजवळ जाऊन दिसेनासा होईल. एप्रिल महिन्यात संध्याकाळी सातच्या सुमारास उत्तर पश्चिमेस तो दिसेल. गुरू वृषभ राशीत दिसत असून रोहिणीपासून दूर सरकताना दिसेल. महिन्याच्या प्रारंभी साडेअकरा वाजता मावळणारा गुरू महिन्याभरात लवकर मावळत जात महिनाअखेरीस दहा वाजेपर्यंतच दिसेल. गुरूचे बिंब ३६ विकलांचे दिसत असून उणे २.१ तेजस्वितेचे दिसेल. गुरू भोवतालचे चार मोठे चंद्र लहान दुर्बिणीतून देखील दिसतात. ते वेगवेगळ्या वेगाने गुरू भोवती २ ते १७ दिवसात प्रदक्षिणा घालतात. यावेळी ते ग्रहणे व पिधाने घडवतात. चंद्राजवळ गुरू २ व ३० एप्रिल रोजी दिसेल.

शनी : गेल्या महिन्यात शनीची सूर्याबरोबर युती झाली होती. युतीनंतर शनी पूर्व क्षितीजावर दाखल होत आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सूर्य सान्निध्यामुळे तो सहजपणे दिसू शकणार नाही. त्यानंतर शनी सूर्योदयापूर्वी तासाभरानंतर उगवताना दिसेल. शनी शेजारीच बुध दिसत असून त्याची युती १० एप्रिल रोजी होईल. आकाश स्वच्छ असल्यास क्षितीजावरची ही युती संधीप्रकाशात बॉयनॉक्युलरच्या साहाय्याने पाहता येईल. यावेळी शनीची तेजस्विता १.२ असून जवळचा बुध काहीसा तेजस्वी व ०.९ तेजस्वितेचा दिसेल. शनी हळूहळू त्याच्या वरच्या बाजूस असलेल्या तेजस्वी शुक्राकडे सरकत असून त्यांची युती २९ तारखेला होईल. चंद्राशेजारी शनी २५ तारखेला दिसेल.

युरेनस-नेपच्यून : एप्रिलमध्ये सूर्य सान्निध्यामुळे दोन्ही ग्रह स्पष्टपणे दिसू शकणार नाही. युरेनस मेष व वृषभ राशीच्या किनाऱ्यावर दिसेल. वृषभेच्या १३ व १४ क्रमांकांच्या परिसरात ५.८ तेजस्वितेचा युरेनस दिसेल. सूर्याजवळ असल्याने नेपच्यून दिसू शकणार नाही.

उल्का : शौरी तारका समूहातील किनाऱ्याकडून म्हणजेच वीणा तारकासमूहातील अभिजित ताऱ्याजवळून ‘लायरीडस्’च्या उल्का फेकल्या गेल्यासारखे दिसेल. थॅचर धूमकेतूच्या कणात पृथ्वी २१-२२ एप्रिल रोजी शिरत असल्याने हा उल्कावर्षाव दिसतो. यावेळी ताशी १५ ते २० उल्का दिसू शकतात.

चंद्र-सूर्य : चैत्र पौर्णिमा १२ एप्रिल रोजी तर अमावस्या २७ एप्रिल रोजी होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०६,२९५ कि.मी.) १४ एप्रिल रोजी तर पृथ्वीजवळ (३,५७,१२१ कि.मी.) २७ एप्रिल रोजी पोहोचेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.