कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्चला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर त्याला पाच दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा (Prashant Koratkar) जामीन अर्ज सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी फेटाळला. कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) आहे.
जामीन अर्ज फेटाळल्याने बचाव पक्ष जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊ शकतो; मात्र तोपर्यंत त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. कोरटकर सुटल्यास इतर साक्षीदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता, त्याची वक्तव्ये सामाजिक तेढ करणारी असल्याने त्यामागील हेतू शोधणे, कोरटकर पळून जाण्याची भीती आदी मुद्दे सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी मांडले.
दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ जोरदार युक्तिवाद चालला. युक्तिवादानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचा आदेश केला. यामुळे कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीवरून देण्यात आलेल्या धमकीत प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानप्रकरणी त्याच्यावर तीन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
त्याला कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्चला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर त्याला पाच दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्या वकिलांनी रविवारी (ता. ३०) दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे, बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. प्रशांत कोरटकरलाही कळंबा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर ठेवण्यात आले.
घाग यांनी पोलिसांकडून कोरटकर याच्याविरोधात दाखल केलेली काही कलमे चुकीची असल्याचे युक्तिवादात सांगितले. त्यांनी सांगितले की, कोरटकरने स्वतःचा मोबाईल पोलिसांकडे सुपुर्द करत सहकार्य केले आहे. त्याचा मोबाईल हॅक झाल्याचा दावाही त्यांनी केला. सोशल मीडियावर कोरटकर आणि सावंत यांच्यातील संवाद व्हायरल झाल्यानंतर कोरटकरला अनेकांचे फोन आले. तेव्हा कोरटकरच्या लक्षात ही बाब आल्याचाही युक्तिवाद घाग यांनी केला. कोरटकर पोलिसांना सहकार्य करत असून, त्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली.
दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेला युक्तिवाद दीड तासाहून अधिक वेळ चालला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीश तट यांनी सायंकाळी निकाल देताना कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सुनावणीवेळी बचाव पक्षाचे ॲड. प्रणिल कालेकर, फिर्यादी इंद्रजित सावंत, तपास अधिकारी संतोष गळवे, सहायक निरीक्षक डॉ. सागर वाघ, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
इतर साक्षीदारांवर प्रभावाची भीती.....सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी मुद्दे मांडले की, कोरटकरने त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे सांगितले असले तरी त्याने १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्याच्याकडे त्या खात्याचा ताबा होता हे दिसून येते. पोलिसांनी काढलेल्या मोबाईल सीडीआरमध्येही कोरटकर याच्याच नंबरवरून इंद्रजित सावंत यांना फोन आल्याचे सांगत मोबाईल हॅकचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील कोरटकरची पोस्टही देखील भक्कम तांत्रिक पुरावा असून, त्यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती आहे. यामागील त्याचा नेमका हेतू शोधण्यासाठी पोलिसांकडून त्याची चौकशी करावी लागणार आहे. कोरटकरला वाहने पुरविणारे, हॉटेलमध्ये थारा देणारे, पैसे पुरविणारे अशा अनेकांकडे चौकशी करणे बाकी असल्याचे मुद्दे युक्तिवादामध्ये मांडताना ॲड. पवार यांनी सर्वोच्य न्यायालयातील विविध खटल्यांचे दाखले दिले.
न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : असीम सरोदेॲड. सरोदे यांनी युक्तिवादामध्ये पोलिस तपास बाकी असून, कोरटकरला मदत करणाऱ्यांपैकी एकाचीच चौकशी झाल्याचे सांगितले. कोरटकरला जामीन दिल्यास इतर साक्षीदारांवर प्रभाव पडून ते जबाब देण्यापासून परावृत्त होण्याची भीती असल्याने त्याला जामीन देऊ नये, असाही त्यांनी युक्तिवाद केला. कोरटकरची वक्तव्ये सामाजिक तेढ निर्माण करणारी असल्याने त्याचा जालना व नागपूरमध्ये दाखल गुन्ह्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जामीन अर्जावरील कोरटकरच्या सह्यांमध्येही तफावत असल्याने ते नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवावेत, असे म्हणणे मांडले. अशातून कोरटकर न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी युक्तिवादामध्ये सांगितले.