शिवप्रेमींनी गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला, परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा प्रयत्न; गावात तणाव, पोलिसांकडून लाठीमार
Marathi April 03, 2025 09:24 AM

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी शिवप्रेमींनी मध्यरात्री गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. मात्र, परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासनाने पुतळा काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. प्रशासन आणि शिवप्रेमींमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

सध्या पट्टणकोडोली गावात तणावपूर्ण शांतता आहे. प्रशासनाने सध्या पुतळा झापून ठेवला आहे. सर्व शासकीय परवानग्या घेऊन लवकरच भव्य कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार, अशी माहिती सरपंच अमोल बाणदार यांनी दिली आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पट्टणकोडोलीमध्ये बस स्थानकाच्या बाजूला मध्यरात्री तीनच्या सुमारास गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींकडून बसविण्यात आला. परवानगी न घेतल्याने प्रशासनाने तो पुतळा हटवण्याची आज तयारी केली होती. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज इचलकरंजी प्रांत कार्यालय, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.

दुकाने बंद; वाहतूक वळवली

सकाळी नऊ वाजल्यापासून प्रशासन कार्यकर्ते व पदाधिकाऱयांशी चर्चा करीत होते; पण मार्ग निघत नव्हता. कोल्हापूर-हुपरी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. गावात दुकाने बंद ठेवून गावकरीही यामध्ये सहभागी झाले होते. यापूर्वी 1987, 1997, 2011मध्ये पट्टणकोडोली गावात जातीय दंगली झाल्याने पट्टणकोडोली गावाची अतिसंवेदनशील म्हणून ओळख आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.