Dombivli News : 14 गावांचे मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे लागले लक्ष; नवीन स्वतंत्र नगरपरिषद होणार का ?
esakal April 04, 2025 05:45 AM

डोंबिवली : नवी मुंबईतील 14 गावांचा निर्णय अद्याप लागलेला नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी या गावाच्या पालिकेतील समावेशाला विरोध केला असून आता ते अंतिम निर्णय नक्की कधी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील 14 गावं, केडीएमसी मधील 18 गाव व अंबरनाथ तालुक्यातील 5 गावे अशी 37 गावांची स्वतंत्र नगर परिषद करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. या मागणीला मंत्री नाईक यांनी सकारात्मक कौल दिला आहे. नुकतीच 14 गावातील पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली असून यावर यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे.नवी मुंबईसाठी 14 गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करणे व्यावहारिक होणार नाही, असे नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे, त्यामुळे आता या 14 गावांचा फुटबॉल झाल्यासारखी परिस्थिती आहे.

राज्याचे अधिवेशन संपले तसेच 31 मार्चची तारीख देखील उलटली. मात्र कल्याण ग्रामीण मधील 14 गावांचा विषय अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे 14 गावे नक्की नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार की नाही, असा प्रश्न येथील गावातील नागरिकांना पडलाय. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसी मधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केलीये. त्यामुळे 14 गावांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की अधिवेशन संम्पल तरी 14 गावांचा कोणता निर्णय झालेला नाही. तर ही 14 गावे, केडीएमसी मधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही नावे घेऊन नविन परिषद करावी, अशी मागणी केली आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास चांगला करता येईल आणि येथील नागरिकांना न्यान मिळेल, तसेच येथील विकासासाठी मंत्री नाईक योग्य निर्णय घेतील. या निर्णयाविषयी मंत्री नाईक शंभर टक्के सकारात्मक आहेत आणि सकारात्मक निर्णय लवकरच येईल अशी अपेक्षा आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले.

तर याबाबत माजी खासदार संजीव नाईक यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की मंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात आपले मत व्यक्त केलेलं आहे, मला विश्वास आहे की या संदर्भात लवकरचं निर्णय होईल, असे नाईक यांनी सांगितले.

तर याच 14 गावच्या विषयाबाबत 14 गाव विकास समितीने मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आहे आणि पत्रही दिले आहे. या विषयाबाबत राजू पाटील म्हणाले की सदर गावे नवीमुंबई महापालिकेत घेण्याचा निर्णय झालेला आहे. गावांसाठी नगर विकास खात्याकडून किंवा सरकारकडून कोणताही निधी वर्ग झालेला नाही.

त्यामुळे मंत्री नाईक यांची अशी भावना झाली आहे की नवी मुंबईवर तो भुर्दंड पडेल. परंतु आमची त्यांना एक विनंती आहे, इथला टॅक्स वसुल केला तर शंभर दीडशे कोटींची वसुली होईल आणि तिकडे अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांची जी ओरड आहे, ही बांधकाम सगळीकडे आहेत आणि हा सर्व विषय प्रशासनाचा अंमलबजावणीचा विषय आहे, त्यामुळे सरकारने तो करावा.. त्यालाही कोणाची अडकाठी नाही. उगीचच 14 गावे नवे मुंबईत सामील झाली असताना त्याचा दप्तर घेण्यात दिरंगाई करून या गावकऱ्यांना वेठीस धरू नये ही आमची विनंती आहे, असे मनसे नेते पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे ही 14 गावे नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट होणार? की ठाकरे गटाची स्वतंत्र नगर परिषदेची मागणी पूर्ण केली जाणार हे आता पहावे लागेल...

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.