घाटनांदूर - परिसरात विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाल्याने परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली, तर शेतातील गोठ्यावरील पत्र उडाले. आंबा, चिकू फळबागेसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमा झाले व विजेचा कडकडाटसह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह गारा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे व विद्युत खांब उन्मळून पडले असून अनेकांच्या घरावरील शेतातील जनावराच्या गोठ्यावरील पत्र उडून गेल्याने शेतकऱ्याची मोठी तारांबळ उडाली. तर आंबा, चिकू, केळी फळबागाचे फुल शेती व पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गिरवली येथील १३२ के व्हि सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ के व्हि विद्युत वाहिनीवर झाडे पडल्याने व विद्युत खांब पडल्याने विद्युत वाहिन्या तुटल्याने पूस जवळगाव घाटनांदूर ३३ केव्हि सबस्टेशनला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तीस गावातील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. डास प्रादुर्भाव व उकाड्याचा त्रास सहन करत रात्र जागून काढली.