Pune News : महाविद्यालयीन तरुण कॅनॉलमध्ये बुडाला; शोधकार्य सुरू
esakal April 04, 2025 06:45 AM

पुणे - जनता वसाहत कॅनॉलमध्ये पोहताना एक महाविद्यालयीन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली. अग्निशामक दल, पोलिस आणि एनडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत तरुणाचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता.

बुधवारी दुपारी पाच-सहा मुले जनता वसाहत परिसरातील कॅनॉलमध्ये पोहत होती. त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पर्वती दर्शन भागातील एक १७ वर्षीय तरुण पाण्यात ओढला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

तरुणाच्या शोधासाठी गुरुवारी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. तसेच, तो पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हडपसर येथील अग्निशामक दलाचे जवानही शोधकार्यात सहभागी झाले आहेत.

गुरुवारी सायंकाळपर्यंतही तो सापडला नसल्याने शोधकार्य अजूनही सुरू आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.