स्टॉक मार्केट क्रॅश मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज (4 एप्रिल) मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. यामुळं शेअर बाजारात विक्रीचं चित्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स आज सुरुवातीच्या टप्प्यात 1000 अंकांनी घसरला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 375 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 9.5 लाख कोटींनी घटलं. फार्मा, आयटी आणि मेटल उद्योगातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर तज्ज्ञांकडून शेअर बाजारात घसरणीचा अंदाज व्यक्त करण्या येत होता. ट्रम्प यांनी 2 एप्रिलला भारतासह विविध देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादत असल्याची घोषणा केली. भारतीय शेअर बाजारात 3 एप्रिलला ट्रम्प टॅरिफचा फारसा परिणाम जाणवला नव्हता.मात्र, आज शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे दिसून आला. गुंतवणूकदारांचे साडे नऊ लाख कोटी रुपये बुडाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार युद्ध सुरु होण्याची शक्यता वाढली आहे. चीन आणि कॅनडानं अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचं ठरवल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिओजित फायनान्शिअलचे वीके विजयकुमार यांनी शेअर बाजारात अनिश्चितता सुरु असून ती कायम राहील असं म्हटलं. आता अमेरिकेनं जागतिक व्यापार युद्ध सुरु केलं आहे. आता चीन, यूरोपिय यनियन आणि इतर देशांकडून प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ लावलं जाऊ शकतं. यामुळं अस्थिरता वाढून जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला नुकसान पोहोचेल, असं विजयकुमार म्हणाले. अमेरिकनं भारतावर 26 टक्के टॅरिफ लादली आहे. कॅनडानं अमेरिकेतून येणाऱ्या गाड्यांच्या पार्टवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्राईम रिसर्च हेड देवर्ष वकील यांच्या मते ट्रम्प टॅरिफमुळं जागतिक व्यापार युद्धासह आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली त्यामुळं अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच फार्मा उद्योगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. फार्मा क्षेत्रावर यापूर्वी लावण्यात आले नसतील असे टॅरिफ लावणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. यानंतर निफ्टी फार्मा इंडेक्स 4.5 टक्के अधिक घसरला आहे. अरबिंदो फार्मा, ल्यूपिन आणि आयपीसीए लॅब्स शेअर 6 टक्के घसरला.
जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्यानं देखील भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये 2020 नंतरची मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील घसरणीमुळं 2.5 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य घटलं. याचा परिणाम आशियाई बाजारात दिसून आला.
निफ्टी च्या सर्व 13 सेक्टरोल निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. सर्वाधिक घसरण फार्मा क्षेत्रात झाला. निफ्टी फार्मा निर्देशांक 4.5 टक्क्यांनी घसरला. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण झाली. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घसरण दिसून आली.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांपासून विक्री सुरु केली होती. ती मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थांबली होती.मात्र, ट्रम्प टॅरिफनंतर पुन्हा एकदा विक्रीचा ट्रेंड सुर झाला. विदेशी गुंतवणूकदारांनी 2806 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 221.47 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांचं भाषण शुक्रवारी रात्री उशिरा होणार आहे. ते अमेरिकन अर्थव्यवस्थेवर भाष्य करतील. ट्रम्प टॅरिफनंतर पतधोरण कसं असेल याचे संकेत देतील. याशिवाय आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक 7 एप्रिलपासून सुरु होणार आहे.तर, 9 एप्रिलला पतधोरण जाहीर होईल. आरबीआय 25 बेसिस पॉइंटची कपात करण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..