अक्षय शिंदे
जालना : उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक भागात पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशाच प्रकारे जालना जिल्ह्यातील नानेगाव या गावात पाण्याची कायम समस्या आहे. यामुळे महिलांना गावाबाहेरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागात ची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे शेतशिवारात जाऊन पाणी आणण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या पुढील दिवसात टंचाई अधिक गडद होण्याचे चित्र आहे. यातच जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
दोन वर्षांपासून टंचाईची समस्या
गेल्या दोन वर्षांपासून या गावात भीषण पाणीटंचाई आहे. महिलांना रोज दोन- दोन किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईच्या समस्येबाबत या पूर्वी अनेक वेळा ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले, आंदोलन देखील करण्यात आले आहेत. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळेच संतप्त झालेल्या महिलांनी आज थेट हंडा मोर्चा काढत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा
आजच्या मोर्चात ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तसेच गावातील पाण्याची समस्या सोडवून पाण्याचे तात्काळ नियोजन करण्याची मागणी केली आहे. हि समस्या न सुटल्यास लेकरा- बाळांसह कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा इशारा दिला आहे. आता या पाणीप्रश्नाकडे प्रशासन लक्ष देतं का, हे पाहण महत्त्वाचे असणार आहे.