लोणावळ्यात पर्यटनाभिमुख रोजगाराच्या मोठ्या संधी - साबळे
esakal April 05, 2025 10:45 PM

लोणावळा, ता.५ : लोणावळा शहरासाठी पर्यटनाभिमुख रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. त्यादृष्टीने आराखडा पुढे जावा आणि शहराच्या विकास विषयक उपक्रमांमध्ये सर्व घटकांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले.
लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची बैठक नगरपरिषद कार्यालयात झाली. त्यावेळी साबळे हे बोलत होते. बैठकीस उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड, शहरातील हॉटेल संघटना, वाहतूक संघटना, कामगार संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, फेरीवाले संघटना आदी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्याधिकारी साबळे यांनी कृती आराखड्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय विभागाचे अधिकारी, संस्था संघटना प्रतिनिधी यांनीही यावेळी आपली मते व्यक्त केली. सर्वांना उपजीविका कृती आराखडा विषयक मार्गदर्शक सूचना पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तसेच सी - लॅप विषयक मूलभूत माहिती दिली. येत्या दहा दिवसांमध्ये सर्वांनी उपजीविका कृती आराखड्याबाबत सूचना, माहिती सल्ला व अपेक्षा लिखित स्वरूपात देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहर उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक संगीता पवार, लेखापाल सीमा पवार, संगीता वीरभद्रे, पूजा राठोड यांनी संयोजन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.