- स्मिता देव, smitah37@gmail.com
उन्हाळा कुठे भाजून काढणाऱ्या उन्हाचा, शुष्क; तर कुठे नकोशा वाटणाऱ्या दमट वातावरणाचा. पण कुठेही गेलं, तरी घाम-घाम आणि तहान-तहान ठरलेली! उन्हाळा आणि आंबे हे समीकरण आहे खरं. पण आंब्यांशिवायही इतर अनेक पदार्थ उन्हाळ्यात आवर्जून केले जाणारे, म्हणून खास असतात! माझ्या लहानपणीची उन्हाळा सुट्टीची आठवण आली, की लालबुंद कलिंगडाचा घरी केलेला ज्यूस आठवतो, तसाच मनात तव्यावरच्या खरपूस, गोडसर ‘सुरनोळी’चा वास दरवळतो.
मी लहान होते, तेव्हा मला साधं पाणी प्यायला आवडायचं नाही. पाणी प्यायला कंटाळा केल्यामुळे उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होऊन डोकं दुखायला लागायचं. आमच्या घरात सरबतांची तयार मिळणारी ‘सिरप्स’ आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्सना बंदी होती. मग घरी केलेलं पन्हं, लिंबू सरबत, कोकम तिवळ (कोकमाचं मिरची घातलेलं सरबत) मदतीला असायचं. ते पिऊन तरतरीत झाल्यासारखं वाटायचं.
ही पेयं तर घरात व्हायचीच, पण आई रोजचं जेवणही उन्हाळ्यात हलकं आणि साधं असावं असं बघायची. जास्त तेल-तिखट नको! जेवणात फळभाज्या असायच्या- त्यातही दुधी भोपळा, दोडका, घोसाळं, पडवळ, अशा भाज्या- ज्याला इंग्लिशमध्ये ‘गोअर्ड’ असा शब्द वापरतात, त्या भाज्या या दिवसात प्रामुख्यानं केल्या जायच्या. जेवणाबरोबर पाणी असलेली रसदार फळं हवीतच.
उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होऊ न देणं खरंतर सोपं आहे. त्यासाठी काही साध्या गोष्टी करून पाहता येतील. पिण्याचं पाणी ‘इन्फ्यूज’ करणं- म्हणजे लिंबूवर्गीय फळांच्या चकत्या किंवा काकडीचे काप घालून थोडा वेळ ठेवलेलं पाणी पिणं. यात पाण्याला चांगला स्वाद येतो आणि ते प्यायला बरं वाटतं. सॉफ्ट ड्रिंक्स न घेता नारळाचं पाणी, ताक, लस्सी वगैरे अधूनमधून पिणं. ‘आईस्ड टी’ किंवा ‘आईस्ड कॉफी’ पिणं. कलिंगड, खरबूज वगैरे फळं नेहमी खाणं...
लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्यावर आम्ही शनिवार-रविवारी पुण्याला माझ्या आत्याकडे राहायला जायचो. आतेभावंडाबरोबर सुट्टीची धमाल यायची. मुंबईहून पुण्याला जाताना पनवेलजवळ रांगेने कलिंगड विकणारे असत. हिरव्या मोठ्या कलिंगडांचे हे मोठेच्या मोठे डोंगर रचलेले असत. विक्रेते त्या डोंगरांमागे लपून जात! बाबा बरोबर लाल आणि गोड कलिंगड निवडून घ्यायचे आणि ते आम्ही आत्याकडे न्यायचो.
त्यांना नुसतं बघून गोड कलिंगड कसं ओळखता येतं, याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. ते म्हणायचे, की कलिंगड छान गोल हवं, हिरवा रंग गडद आणि ताजा हवा, कलिंगडाला वजन हवं आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलिंगड शेतात जिथे जमिनीला लागलेलं होतं, ती जागा पहायची. तो भाग चांगला पिवळा हवा. असं निवडून घेतलंत तर कलिंगड रसदार आणि गोड लागणार!
कलिंगडाचा आम्ही घरी रस करायचो आणि आत्या वेगवेगळी सॅलड्स करायची. पण त्याबरोबर आमच्या उन्हाळी सुट्ट्यांचा आकर्षणाचा बिंदू असायचा तो ‘सुरनोळी’. तीही कलिंगडाच्या सालाच्या आतला गर घातलेली. डोशासारखा हा गोडसर पदार्थ मऊ आणि लुसलुशीत असतो.
त्यावरून साजुक तुपाची धार हवीच! नुसत्या वासानंच तोंडाला पाणी सुटतं. आज त्या सुरनोळीची रेसिपी तुमच्यासाठी. उन्हाळ्यात नक्की करून पहावी अशी. त्याबरोबर या दिवसांत करावीच अशी दोडक्याची जरा वेगळ्या प्रकारची भाजी.
सुरनोळी (दोन प्रकारची)
साहित्य : १ कप उकडा तांदूळ, अर्धा टीस्पून मेथीदाणे, अर्धा कप जाड पोहे, एक तृतीयांश कप ओलं खोबरं, एक तृतीयांश कप कलिंगडाच्या सालाच्या आतला पांढरा गर (किसून),१ टेबलस्पून गूळ, मीठ, तूप.
कृती : तांदूळ आणि मेथीदाणे एकत्र धुवून घ्या आणि ते ५-६ तासांसाठी भिजत ठेवा. ५-६ तासांनी ते मिक्सरवर वाटायचे आहेत, त्याच्या तासभर आधी पोहे पाण्यात भिजत ठेवा. (पातळ पोहे वापरले तरी चालतात, मात्र ते काहीच मिनिटं भिजवावे लागतील.) मिक्सरच्या मोठ्या भांड्यात तांदूळ, मेथीदाणे, पोहे, ओलं खोबरं आणि कलिंगडाच्या सालाला लागून असलेला किसलेला पांढरा गर एकत्र करून बारीक पेस्ट करा. हे पेस्ट निम्मी निम्मी दोन बाऊलमध्ये काढून घ्या. एका बाऊलमधील पिठात चवीनुसार मीठ घाला, तर दुसऱ्या बाऊलमधील पिठात गूळ घाला. दोन्ही बाऊल झाकून पीठ आंबवण्यासाठी १२-१५ तास (बाहेर खूप जास्त तापमान असेल, तर पीठ लवकर आंबेल.) ठेवून द्या. पीठ चांगलं आंबलेलं दिसलं, की सुरनोळ्या करायला घ्या. पीठ घट्ट वाटलं, तर थोडं पाणी घालून सरसरीत करा. (उन्हाळा नसतो तेव्हा पीठ लवकर आंबत नाही, तेव्हा सुरनोळी करण्यापूर्वी पिठात १ चिमूट बेकिंग सोडा घालावा.) डोशाचा लोखंडी तवा तापवा आणि त्यावर तेल वा तूप सोडून डावभर पीठ घाला. पीठ तव्यावर आपलं आपण पसरू द्या. सुरनोळीवर बुडबुडे दिसू लागले, की बाजूने तूप वा तेल सोडा. मंद ते मध्यम आचेवर सुरनोळी शिजू द्या. सुरनोळी उलटत नाहीत. गूळ घातलेली सुरनोळी साजुक तूप घालून आणि नुसतं मीठ घातलेली सुरनोळी नारळाच्या चटणीबरोबर खायला देतात.
घोसाळ्या उपकारी (दोडक्याची बटाटा घालून भाजी)
साहित्य : अर्धा किलो दोडका, २ बटाटे, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून साखर, अर्धा टीस्पूनमोहरी, मीठ, तेल.
कृती : दोडक्याच्या शिरा काढून त्याचे अंदाजे १ सेंटीमीटरचे चौकोनी तुकडे करून घ्या. बटाट्यांची सालं काढून त्याचेही तेवढेच तुकडे करून घ्या. कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली, की दोडका व बटाटा घाला. मिनिटभर परता. तिखट, हळद, साखर आणि चवीनुसार मीठ घाला. व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून शिजवा. दोडका पूर्ण शिजला की भाजी तयार. अजिबात जास्तीचे मसाले घालावे न लागणारी ही भाजी चवीला उत्तम लागते आणि पचायलाही हलकी असते.