नागपूर : मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सात कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करीत, त्यात कंपनीच्या पैसा वळवित, कंपनीची ४ कोटी ८३ लाख ३० हजार रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीचे कार्यकारी व्यवस्थापक अरविंद विनोद मालगुंड (वय ४१, रा. जयंतीनगरी, बेसा पिपळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे.
जयंत समीर दास (रा.एनआयटी कॉलनी, नारा रोड, जरीपटका), आदित्य वसंत डोंगरे (रा. मॉडेल मिल चौक, गणेशपेठ), पीयूष योगेश सोडारी (रा. भाग्यश्री ले-आउट, त्रिमूर्तीनगर), मुकेश कुमार (रा. बारईपुरा, मस्कासात), पवन प्रल्हाद चचाने (रा. स्नेहदीप कॉलनी), अजिंक्य प्रदीप मेश्राम (रा.गोपाल नगर, तिसरा बस स्टॉप), सुरेंद्र हरिराम आगाशे (रा.महात्मा फुलेनगर, सोमलवाडा) अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहान परिसरात असलेल्या हेक्सावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना ई-कॉमर्स सर्व्हीस पुरविण्यात येते.
त्यानुसार एखाद्या कंपनीचे उत्पादन ऑनलाइन खरेदी केल्यावर ते न आवडल्यास वा त्यात काही समस्या आल्यास ते उत्पादन परत घेत, त्यांचे पैसे परत देण्यात येते. त्यासाठी कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधण्यात येतो. दरम्यान सातही जणांनी कंपनीच्या नावे बनावट ग्राहकांच्या आयडी तयार करून २९ डिसेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ४ कोटी ८३ लाख ३० हजार १६८ रुपये रिफंड केले. तसेच बनावट हिशोब तयार करून त्यासंदर्भातील कागदपत्रे तयार केली. दरम्यान ही बाब निदर्शनास येताच, सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून सातही कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
असे फुटले बिंगदरम्यान कंपनीच्या क्वॉलिटी कंट्रोल टिमच्या वतीने दोन वर्षांच्या डेटाची तपासणी केली. त्या डेटामध्ये कंपनीकडून विविध ग्राहकांना पैसे रिफंड करण्यात आल्याचे दिसले. मात्र, त्याबदल्यात वस्तू परत आलेल्या नसल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी त्यांनी तपासणी केली असता, कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले. त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता, कंपनीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.