पंजाबमध्ये जप्त केलेल्या कोटींची औषधे
Marathi April 12, 2025 09:24 AM

ड्रग्ज तस्कर हीरा सिंगला अटक, साथीदार फरार; पाकिस्तानी कनेक्शन उघड

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाब पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) बॉर्डर रेंज विभागाने एका संघटित कारवाई अंतर्गत मोठे यश मिळवले आहे. पथकाने अमृतसर येथील घरिंडा ठाण्यातील खैरा गावातील रहिवासी हीरा सिंग याला अटक करत त्याच्या ताब्यातून 18.227 किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यावधींच्या घरात असल्याची माहिती देण्यात आली. हीरा सिंगचा साथीदार फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जप्त केलेले 18.227 किलो हेरॉईन हे या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक आहे.

अटक करण्यात आलेला हीरा सिंग आणि त्याचा साथीदार कुलविंदर सिंग उर्फ किंडा (गाव दौके, पोलीस स्टेशन घरिंडा) हे पाकिस्तानस्थित ड्रग्ज तस्कर ‘बिल्ला’ याच्या संपर्कात होते. बिल्लाच्या सूचनेनुसार हे दोघेही सीमेपलीकडून हेरॉईनची तस्करी करून त्याचा पुरवठा पंजाबसह अन्य राज्यांमध्ये करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. सदर हेरॉईन पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पोहोचवले जात होते. सीमावर्ती भागात पाठविण्यात आलेले अमली पदार्थ बिल्लाच्या सूचनेनुसार विविध भागात पाठवले जात होते. हीरा सिंगला अटक करण्यात आली असली तरी त्याचा साथीदार कुलविंदर सिंग अजूनही फरार आहे. पोलीस पथके त्याच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर सतत छापे टाकत आहेत. या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सामील आहे हेदेखील सुरक्षा संस्था शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.