झी मराठीवर गाजलेल्या काहे दिया परदेस या मालिकामुळे सायली संजीव घराघरात पोहोचली. या मालिकेत सायलीने गौरी हे पात्र साकारलं होतं. सायलीचा सौज्वळपणा आणि निखळ सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. सायलीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यत सायलीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्ये सायलीने काम केल आहे.
अभिनेत्री सायली संजीवचा जन्म 31 जानेवारी 1993 मध्ये धुळे येथे झाला आहे. तिचे वडील तहसीलदार होते तर आई गृहिणी आहे. सायलीला एक भाऊही आहे.
सायलीने शालेय शिक्षण धुळे जिल्ह्यातील आरजेसी हायस्कूलमध्ये पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने नाशिकच्या एचपीटी कॉलेजमध्ये बीए पॉलिटिक्सची पदवी घेतली आहे. कॉलेज स्तरावर तिने नाटकांत काम करण्यास सुरूवात केली होती. तिने कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग देखील केले आहे. कॉलेजमध्ये असताना सायलीला अनेक संधी मिळाल्या. सायलीला तिच्या कॉलेजमध्ये सर्वौत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. याच पुरस्कारानंतर सायलीने आपलं करियर अभिनय क्षेत्रात करण्याचे ठरवले.
मालिकेत काम करण्यापूर्वी सायलीने एका म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. पण, सायलीला खरी ओळख मिळाली ती काहे दिया परदेस या मालिकेमुळे… 2016 मध्ये झी मराठीवर प्रसारित झालेल्या काहे दिया परदेस या मालिकेतून तिने अभिनयात पर्दापण केले. यातील गौरीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यानंतर तिने परफेक्ट पार्टी, गुलमोहर, शुभमंगल ऑनलाइन अशा मालिकांमध्ये काम केले आहे. सायलीने अनेक चित्रपटांतही काम केले आहे. जसे की, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, आटपाडी नाईट्स, पोलीस लाईन, बस्ता, मन फकिरा, सातारचा सलमान, एबी आणि सीडी आदी चित्रपट…
अशोक सराफ यांना सायली पप्पा अशी हाक मारते. यामागचे कारण विचारले असता ती सांगते की, अशोक सराफ आणि निवेदिता यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांनी मला नेहमीच मुलीसारखं वागवलं आहे. त्यामुळे मी त्यांना पप्पा अशी हाक मारते. याशिवाय सायली ही निवेदिता सराफ यांच्यासारखीच दिसते, असंही सर्वत्र म्हटले जाते.
सायलीने अभिनयात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरूवात केली. तिचं आडनाव फारसं कोणाला माहितही नाही. सायलीचं आडनाव चांदोस्कर असे आहे. पण, तिला एवढं मोठं आडनाव नको होतं, आपलं नाव लहान असावं असं तिला वाटायचं. त्यामुळे तिने आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला.