नाशिक रोड- महावितरने जलसंवर्धनासाठी पुढाकार घेत दैनंदिन वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचा म्हणजे मुख्यत्वे अंघोळ व इतर सांडपाण्याचा (ग्रेवॉटर) शुद्धीकरण करून पुनर्वापर करीत महावितरणच्या एकलहरे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रातील आवारात असलेल्या वृक्ष, फुलझाडे, बागेकरिता वापर करण्यात येत आहे. यासाठीच्या पाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांच्या हस्ते झाले. यामधून वर्षाला १० लाख लिटर शुद्ध पाण्याची बचत होणार आहे.
निवासी, कार्यालय किंवा वसतिगृह तत्सम इमारतीमधील रहिवाशांच्या दिनचर्या जसे स्नान, वॉशिंग मशिन, वॉश बेसिन यासारखा वापरानंतर वाया जाणारे पाणी म्हणजेच ग्रेवॉटर. हे पाणी एकूण सांडपाण्यापैकी सुमारे ६५ टक्के असते.
दैनंदिन काळात जागतिक जलसंपत्तीचा पुरवठा कमी होत आहे. जलसंवर्धन आणि पुनर्वापर करण्यासाठी महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे नाशिकचे मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रेय बनसोडे यांच्या संकल्पनेतून या परिसरातील निवासी प्रशिक्षणार्थी इमारतीमधून येणारे दैनंदिन वापर होणारे ग्रेवॉटरसाठी शुद्धीकरण प्रकल्पाची नुकतीच उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये ही पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार आहे.
सदर प्रकल्पाची शुद्धीकरण प्रक्रिया क्षमता ८ हजार लिटर प्रतिदिन असून, प्रकिया झालेले पाणी हे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या परिसरातील संपूर्ण वृक्ष व फुलबागेच्या संवर्धनासाठी वापर करण्यात येत आहे. या पाण्याच्या वापरामुळे दैनंदिन प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राच्या परिसरातील संपूर्ण झाडांसाठी लागणारे अंदाजित ४ हजार ५०० लिटर पाणी या माध्यमातून मिळत आहे.
म्हणजेच वार्षिक अंदाजे १० लाख लिटर पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. प्रकल्प उभारणीची संकल्पना मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रेय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संगीता गजबे , सहायक अभियंता गिरीश मोरे, रूपेश खरपकार यांनी काम बघितले, जलकॉन्सर्व्ह टेक्नोलॉजी कंपनीमार्फत उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी संचालक अरविंद भादीकर, मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रेय बनसोडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आदी उपस्थित होते.