कवठे येमाई, ता. १२ : सनईच्या सुमधुर सुरावर ढोल-ताशा, संबळ, डफ, झांज, लेझीम पथक यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली पालखी, भंडाऱ्याची उधळण अन् ‘अंबाबाईचा उदो उदो... जगदंबेचा उदो उदो’च्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा पार पडला.
कवठे येमाई येथील श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकभक्त दरवर्षी हजेरी लावत असतात. नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. शुक्रवारी (ता. ११) श्री येमाई देवी सभागृहापासून देवीला चोळी-पातळ वाजत-गाजत नेण्यात आले. गावापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवीच्या मंदिरात शनिवारी (ता. १२) सकाळी अभिषेक व महापूजेने दिवसाची सुरुवात झाली. दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसा आणि भजनाचे आयोजन केले होते. त्यानंतर आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी सनईच्या सुरावटीत आणि ढोल-ताशांच्या निनादात मंदिराकडे रवाना झाली.
गावातील विविध मंडळांनी पारंपरिक ढोल-लेझीम पथकाच्या साहाय्याने प्रात्यक्षिक सादर करत वातावरण अधिक रंगतदार केले. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘अंबाबाईचा उदो उदो... जगदंबेचा उदो उदो’च्या जयघोषात आणि भक्तिभावाने अनवाणी पायांनी पालखी गावापासून मंदिरात नेण्यात आली. आरती व ओलांड्याने पालखी सोहळ्याची सांगता झाली.
यात्रेनिमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात पालखी मिरवणूक, ढोल-लेझीम स्पर्धा, दारू काम, बैलगाडा शर्यती, तमाशा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. १३) चितपट निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे.