पाखरावर प्रेम करणारा पर्वत
esakal April 13, 2025 09:45 AM

एक होता पर्वत. उघडा-बोडका, खडकाळ. उजाड वाळवंटात एकटाच उभा होता बिचारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत ना झाडं. पानांची सळसळसुद्धा कधी ऐकली नाही त्याने, तर किड्यांची गुणगुण, पक्ष्यांचं गाणं आणि प्राण्यांच्या गर्जना कुठून ऐकणार तो!

सूर्याची ऊब आणि वाऱ्याचा गारवा तेवढा त्याला मिळायचा. सूर्य, चंद्र यांच्या जाण्या-येण्याचे मार्ग त्याला माहित झाले होते. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात दूरवर असणारे तारेसुद्धा सावकाश सरकत जाताना दिसायचे, पण मायेच्या एका स्पर्शासाठी मात्र तो आसुसलेला होता.

एक दिवस काही वेगळंच घडलं! आसपासच्या ओसाड, नीरस, स्तब्ध अशा निसर्गचित्रावर अचानक कुठून तरी एक लालसर ठिपका उमटला. तो ठिपका म्हणजे एक लहानसं पाखरू होतं! पर्वताच्या माथ्यावर, आभाळात ते गोल गोल भिरभिरलं आणि उतारावरच्या खडकावर विसावलं.

त्या पाखराच्या टोकदार बोटांची पकड, पिसांनी भरलेल्या त्याच्या मऊ मऊ शरीराचा स्पर्श झाला मात्र आणि त्या अनोख्या अनुभवाने पर्वत थरारून गेला! त्याला वाटलं याचीच तर कमी होती आपल्या आयुष्यात! ज्याची सतत एक अनामिक ओढ वाटत आली, ती हीच तर भावना!

पर्वताने उत्सुकतेने पाखराला विचारलं, “कोण तू? नाव काय तुझं?” त्या पाखराचं नाव होतं ‘आनंदी.’ ती लांबवरच्या हिरव्यागार देशातून आली होती. घरटं बांधण्यासाठी एखादी छानशी जागा मिळतेय का, याचा ती शोध घेत होती. या पर्वतावर ती काही वेळ विश्रांतीसाठी म्हणून थांबली होती आणि आराम करून झाला की पुन्हा जागा शोधण्यासाठी निघणार होती.

पर्वत तिला म्हणाला, “तुझ्यासारखं काही पाहिलंच नव्हतं आतापर्यंत. तुला जायलाच पाहिजे का? तू इथेच का राहत नाहीस?” पर्वताची कितीही इच्छा असली, तरी अन्नपाणी मिळणार कसं होतं तिथे? पर्वतावर ना झाड ना जवळ एखादा झरा!

“खरंय, पण राहता आलं नाही तरी पुन्हा केव्हा तरी येशील का?” पर्वताने म्हटलं.

आनंदीने विचार केला की, आपण आजपर्यंत किती तरी प्रवास केले, अनेक पर्वतांवर विसावलो, पण आपली अशी विचारपूस आजपर्यंत कोणीच केली नाही. हा पहिलाच असा ज्याने मला परत बोलावलं, मला परत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फक्त वसंतात का होईना आणि अगदी थोडा वेळच असलं तरीही आपण परत येऊ या पर्वताला भेटायला. तिने तसं पर्वताला सांगितल्यावर पर्वत आनंदून गेला, तेवढ्यात आनंदीने तिच्या गोड आवाजात एक गाणं गायला सुरुवात केली.

हे काय? गाणं? संगीत? पर्वतासाठी हेही नवीनच होतं. तो अगदी मनापासून ते स्वर अनुभवत होता. निरोप घेताना आनंदी म्हणाली, “एक गोष्ट मात्र मला सांगायला हवी. आम्हा पाखरांचं आयुष्य फार मोठं नसतं. प्रत्येक वसंतात तुला भेटायला आले, तरी आपल्या खूप भेटी होणार नाहीत.

मी आले काय, गेले काय, आतापर्यंत कोणत्याही पर्वताने कसलीही पर्वा केली नाही, पण तू मात्र वेगळा आहेस. म्हणून तुला एक वचन देते. मी माझ्या एका मुलीला माझंच नाव देईन-‘आनंदी’. या माझ्या मुलीला मी तुझ्याविषयी सांगेन, तुझा पत्ता देईन, म्हणजे माझ्यानंतर ती तुला भेटायला येईल आणि हो, तिला मी तिच्या एका मुलीचं नाव तिने आनंदी ठेवावं, असंही सांगेन.

म्हणजे कळतंय ना तुला? प्रत्येक आनंदीला आनंदी नावाची एक मुलगी असेल! त्यामुळे पुढे कितीही वर्षं लोटली तरी प्रत्येक वसंतात तुझी मैत्रीण आनंदी तुला भेटेलच जी तुझ्या माथ्यावर भिरभिरेल, अंगा-खांद्यावर बागडेल आणि तुझ्यासाठी गाणंसुद्धा म्हणेल!’

पर्वताला खरं तर अजूनसुद्धा आनंदीने जावं असं वाटत नव्हतं, पण तिची कल्पना ऐकून त्याला खूपच बरं वाटलं. आपले सूर पर्वताच्या सोबतीला ठेवून, पर्वताचा निरोप घेऊन ती निघाली पुढच्या प्रवासाला. त्यानंतरच्या प्रत्येक वसंत ऋतूत एक छोटसं पाखरू पर्वताजवळ यायचं, “मी आनंदी, तुला भेटायला आले!” असं म्हणायचं, गाणं गायचं, पर्वताच्या सभोवताली फिरायचं आणि त्याच्या कुशीत येऊन विसावायचं. निरोप घेताना मात्र पर्वत आनंदीला इथेच राहण्याची विनवणी करायचा आणि आनंदीचं उत्तरही ठरलेलं असायचं. “नाही रे, पण पुढच्या वर्षी येईन हं मी पुन्हा!”

तिच्या या उत्तराने पर्वत तात्पुरतं समाधान मानून घेत असे, पण खरं तर आनंदीचा निरोप घेणं, पुढल्या वसंतापर्यंतचा एवढा मोठा काळ तिची वाट पाहण्यात घालवणं त्याला फार कठीण जाऊ लागलं. असे नव्व्याण्णव वसंत ऋतू आले आणि गेले. शंभराव्या वसंताच्या वेळीसुद्धा आनंदीने ‘आता नाही राहता येणार, परत येईन की पुढच्या वर्षी!’ असं म्हंटलं.

ती नजरेआड होईपर्यंत पर्वत पाहत राहिला आणि अचानक पाहता पाहता पर्वताचं हृदय दुभंगलं आणि आजपर्यंतचं आत दाबून ठेवलेलं सगळं दुःख उसळून बाहेर पडलं. पर्वताचे अश्रू झऱ्याच्या रूपाने बाहेर पडू लागले. त्या पुढच्या वसंतात आलेल्या आनंदीला पर्वताने काहीच उत्तर दिलं नाही.

ती परत जाणार. पुन्हा एकटेपणा. पुन्हा प्रतीक्षा, हेच चक्र त्याच्या डोक्यात फिरू लागलं. त्याला नेहमीसारखं आनंदीला भेटून खूश होताच येईना. अगदी निरोपाच्या वेळीसुद्धा त्याची आसवं गळतच होती. आनंदीने हे सगळं पाहिलं. ‘पुढच्या वर्षी परत येईन हं!’ असं हलकेच म्हणून ती उडून गेली.

पुढच्या वसंतात आनंदी आली, पण या वेळी तिने सोबत काही तरी आणलं होतं-एक दाणा! तो दाणा पर्वताच्या अविरत वाहणाऱ्या आसवांच्या झऱ्याजवळ, एका खडकाच्या फटीत हळूच ठेवून दिला. पुढल्या काही आठवड्यांमध्ये त्या दाण्याला कोवळी मुळं फुटली. ती हळूहळू आणखी खोलवर पसरायला लागली.

काही दिवसांनी त्या दाण्याला एक कोंभ फुटला आणि मग एक दिवस त्या कोंभाला फुटली दोन हिरवीगार कोवळी पानं! आपल्या पर्वताचं या सगळ्याकडे लक्षच नव्हतं. त्याच्या दुःखापुढे, हसणारं हे इवलंसं रोप त्याला दिसलंच नाही. पुढच्या अनेक वसंतांत आनंदी एक एक दाणा घेऊन आली आणि मग खडकात, दगडात तो प्रत्येक दाणा तिने खोचून ठेवला. पर्वत अजूनही रडत होता.

काही वर्षांनंतर नव्या रोपांची मुळं पसरू लागली, खडक मवाळ झाले, गवत उगवलं, गवतातून छोटी फुलझाडंही वर आली आणि तो पहिला दाणा? त्याची मुळं खोलवर जात पर्वताच्या हृदयाला जाऊन भिडली होती आणि त्याच्या कोंभांचं तर आता एक मोठं, डौलदार झाड झालं होतं! हळूहळू पर्वताला, त्याच्या आसपास वाढणारं हे हिरवेपण दिसू लागलं, तसं तसं त्याच्या जखमा भरून येऊ लागल्या.

झरा अजूनही वाहत होताच पण आता ते आनंदाश्रू होते! पर्वताची आणि त्याच्या सभोवतालची ही बदलती रूपं, छोटीशी लालसर अंगाची, हिरव्या निळ्या डोळ्यांची आनंदी, स्टीव्हन अँटकेन यांच्या चित्रांतून आपल्याला दिसतात. पाखरावर प्रेम करणाऱ्या पर्वताची ही गोष्ट लिहिलीय ॲलिस मॅकलेरन यांनी. याचा मराठी अनुवाद वसुधा आंबिये यांनी केला असून, तुलिका प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

पुढची अनेक वर्षं आनंदी दाणे घेऊन येत राहिली. पर्वताच्या आनंदाश्रूंनी ओलावलेल्या जमिनीत गवत, रोपं, झाडं उगवत राहिली. “काय केलं तर तुला इथे राहता येईल?” पर्वताने एका वसंतात आनंदीला विचारलं, पण तिचं उत्तर अजूनही बदलेलं नव्हतं. अजून काही वर्षं गेली. पर्वतावरचे झरे आता पर्वत पायथ्याशी असलेल्या उजाड माळापर्यंत पोहोचले होते.

पाण्यामुळे तिथेही जीवन बहरू लागलं. झाडं तर होतीच, पण आता प्राण्यांचे कळपसुद्धा वस्तीला येऊ लागले. पर्वताचीही उमेद वाढली आणि त्याने अगदी मनापासून सगळ्या मुळांना स्वतःमध्ये सामावून घेतलं. त्याच्या या प्रेमामुळे मग झाडं आणखी जोमाने वाढली!

आपणही ‘आनंदी’ होऊ शकतो, माहितीय? ४-५ प्रेमाचे शब्द पेरले की, तेवढ्यानेही एखाद्याचं एकाकी-दुःखी आयुष्य किंवा एखादा वाईट जात असलेला दिवस म्हणूया, सुसह्य-आनंदी होऊ शकतो! कधी कधी ‘पर्वत’ही असतो आपण. वाट पाहत असतो एक दाणा रूजण्याची.

अशा वेळी आनंदीसारख्या मैत्रिणीला आणि तिने आणलेल्या दाण्याला रुजवून घेण्याएवढा मोकळेपणा मात्र दाखवायला हवा, हो ना? आणि पुढचा वसंत आला. आनंदीही आली, पण यावेळी दाणा नाही तर चोचीत एक कोवळी फांदी घेऊन आली.

घरटं बांधायला! आपल्या घरट्यासाठी तिने निवडलं पहिल्या दाण्यातून उगवलेल्या पर्वतावरच्या पहिल्या-वहिल्या झाडाला! या वेळी तिने पर्वताला सांगितलं, ‘‘मी आनंदी! मी आले, आले... इथेच राहायला आले!”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.