वरच्या मजल्यावरील रहिवाशांच्या
पडताळणीसाठी द्यावे लागतेय शपथपत्र
धारावी पुनर्विकास प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र झोपडीधारकांना धरावीतच घरे दिली जाणार असून, अपात्र किंवा वरच्या मजल्यावरील रहिवाशांना धारावीबाहेर घरे देण्याची तरतूद आहे, मात्र वरच्या मजल्यावरील बहुतेक रहिवाशांकडे त्यांचे निवासस्थान सिद्ध करण्यासठी अधिकृत नोंदी नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार संबंधितांकडून शपथपत्र घेतले जात आहेत.
धारावीत पुनर्विकासाच्या दृष्टीने सध्या सर्वेक्षण जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक धारावीकराला घर देण्याच्या सरकारच्या ठोस वचनबद्धतेनुसार, सर्वेक्षण पथके वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांशी सक्रियपणे संवाद साधत आहेत. राज्य सरकारच्या ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार, धारावीत १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत राहणारे वरच्या मजल्यावरील सर्व निवासी सदनिकाधारक भाडेपट्टा योजनेअंतर्गत पुनर्वसनासाठी पात्र आहेत. त्यानुसार या लाभार्थ्यांना धारावीबाहेर परंतु मुंबई महानगर प्रदेशात ३०० चौरस फुटांची घरे नाममात्र किंमत भरून मिळणार आहेत. दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार सध्या वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पात्रता सिद्ध करण्यासाठी शपथपत्रे गोळा करण्यात येत असल्याचे एनएमडीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.
या कागदपत्रांची गरज
वरच्या मजल्यावरील रहिवाशांना त्यांचा ताबा सिद्ध करण्यासाठी वीजबिल, नोंदणीकृत विक्री किंवा भाडेकरार, आधार कार्ड, रेशन कार्ड, मजला क्रमांक दर्शविणारा पासपोर्ट किंवा तळमजल्यावरील पात्र रहिवाशाने प्रमाणित केलेले शपथपत्र यापैकी एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. शपथपत्र हे स्वीकारार्ह कागदपत्रांपैकी एक आहे. तथापि वरच्या मजल्यावरील बहुतेक रहिवाशांकडे त्यांचे निवासस्थान सिद्ध करण्यासाठी अधिकृत नोंदी नाहीत, त्यामुळे जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र हा एक व्यावहारिक पर्याय आहे.