वाल्मिकच्या एन्काऊंटरची ऑफर, करुणा शर्मांनी कासलेची री ओढली, म्हणाल्या ते खरं..
Marathi April 14, 2025 09:28 PM

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमधील (Beed) गुन्हेगारीचा चेहरा उघडा पडला. या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, बीडमध्ये अनेक पोलिसांनी वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीला मदत करत त्यास प्रोत्साहन दिल्याने संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशाच कारवाईतून निलंबित करण्यात आलेल्या बीडमधील सायबर पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी म्हटले आहे. आता, रणजीत कासले यांच्या वक्तव्यावर आमदार धनजंय मुंडेंच्या करुणा शर्मा (करुणा शर्मा) यांनी मत व्यक्त केलंय. दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो, असे म्हणत त्यांनी कासले यांच्या वक्तव्याला एकप्रकारे दुजोराच दिला आहे.

वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असे कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरुन शेअर केल्याने बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच, आता करुणा शर्मा यांनी देखील रणजीत कासले यांच्या दाव्यासंदर्भाने प्रतिक्रिया देताना एकप्रकारे दुजोराच दिला आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा आहे, खूप वर्षापासून मुंडे घराण्यात आहे, धनंजय मुंडेंसोबत आहे. धनंजय मुडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत आणि आज तो अडकला आहे. वाल्मिकला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणार आहे, त्यामुळे कासलेला धनंजय मुंडेंनी एन्काऊंटरची ऑफर दिली असेल, असे करुणा शर्मा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. तसेच, दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो, त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी कासले यांनी केलेला दावा खरा आहे, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.

कासलेसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

कासले यांनी केलेल्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन देणार आहे. तसेच, कासलेला पुन्हा त्याच्या खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी देखील अर्ज करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले.

कोण आहेत रणजीत कासले

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबळजनक दावे केले होते. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

कुख्यात गुंड जेलमधून बाहेर आला, समर्थकांनी 8 गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापला, पुढचा गुन्हा, पुढचं कलम कोणतं?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.