'लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आपण चायनाला देखील मागे टाकले आहे.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 'आता एक किंवा दोन अपत्यावर थांबा अन्यथा ब्राह्मदेव जरी आला तरी पाणी पुढं पुरणं अशक्य होईल.' असं म्हणत अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत असून याची चर्चा होत आहे.
लोकसंख्येबाबत आणि पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केले आहे. 'अलीकडच्या काळात पाण्याचा वापर वाढला आहे. दादा कोंडकेंच्या काळात दगडाचा वापर व्हायचा. त्यानंतर टरमाळे आलं आणि आता फ्लश आले त्यामुळे दहा लिटर पाणी एकदम वाया जाते. त्यामुळे नवीन झालेल्या मुला मुलींना सांगा एक किंवा दोन आपत्य ठेवा. नाहीतर वरून ब्रह्मदेव आला तरी सर्वांना पाणी पुरणार नाही.' असं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले. अहिल्यानगरमधील जामखेड येथील जाहीर सभेमध्ये त्यांनी हे विधान केले आहे.
अजित पवार गुरूवारी अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उदघाटनावेळी भाषणात अजित पवारांनी पाण्याचा उदभवणाऱ्या प्रश्नाला लोकसंख्या जबाबदार असल्याचे सांगितलं. अजित पवार पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत म्हणाले की, 'देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ३५ कोटी लोकसंख्या होती आणि आज १४० कोटी लोकसंख्या झाली आहे. जगात आपला कुणी हात धरत नाही. आता चायना एकावर थांबायला लागलं आहे.'
अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'आम्ही सारखं अभ्यास करतोय की कुठनं पाणी आणायचं. त्याकाळात पाण्यावर वीज तयार केली जायची आता टाटाच्या धरणावर वीज तयार केली जात आहे. आता आम्ही इंडस्ट्रीजला सांगतोय गावातल्या ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इंडस्ट्रीजला वापरा. दादा कोंडके यांच्यावेळेस दगडावर भागायचं नंतर टरमाळेवर भागायचं आणि आता बाथरूममध्ये फ्लश केलं तरी १० लिटर पाणी जातं आहे.'