सावंतवाडी - येथील बाजारपेठेमध्ये थेट बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होत आहे. पहिल्या टप्प्यातील हा आंबा सद्यस्थितीत साडेचारशे ते सहाशे अशा दराने विकला जात आहे; मात्र असे असले तरी हापूसपेक्षा गोवा मानकूर या आंब्याला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळत आहे. हा दर पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचेही बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.
फळांचा राजा म्हणून ‘हापूस’ आंब्याकडे पाहिले जाते. चवीला मधाळ असलेल्या हापूसला देशभरात मागणी आहे. कोकणातील हापूस म्हटला तर त्याची चव काहीशी वेगळीच असते. त्यामुळे येथील आंब्याला मागणी आणि दरही तसाच असतो. हवामानातील झपाट्याने होणारे बदल आणि प्रामुख्याने फळमाशींचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव पाहता आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे.
आंब्याला पोषक असणारे वातावरण अलीकडच्या काळामध्ये सातत्याने बदलत असल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादनावर पाहायला मिळत आहे. मागणीपेक्षा उत्पादन कमी असल्याने सुरुवातीला बाजारपेठेमध्ये हापूस आंब्याचे दर काहीसे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असेच पाहायला मिळतात. यावर्षीही सुरुवातीपासून आंब्याचे दर प्रति डझन एक हजारांच्यावर होते; परंतु कालांतराने हे दर कमी झाले. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये दाखल झालेला आहे.
यावर्षी आंब्याचा आकार काही प्रमाणात लहान पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दर सद्यस्थितीत साडेचारशे ते पाचशेपर्यंत स्थिरावले आहेत. महिन्या-दीड महिन्यापूर्वी बाजारात दाखल झालेला हापूस १००० ते ११०० रुपयापर्यंत विकला जात होता. सुरुवातीला बाजारात दाखल झालेला आंबा पूर्ण तयार होण्याआधीच तो पिकवला गेल्याने त्याला म्हणावी तशी चव नसल्याने त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. परंतु सद्यस्थितीत बाजारात दाखल झालेला आंबा हा पूर्ण तयार होऊन पिकवलेला असल्याने त्याला मोठी मागणी आहे.
सावंतवाडी बाजारपेठेमध्ये नजीकच्या होडावडा, आडेली, कामळेवीर, तळवडे, नेमळे या भागांतून सकाळी पहाटे बागायतदार आंबे बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यांच्याकडून साडेचारशेपासून सहाशेपर्यंत हापूस आंब्याची विक्री केली जाते. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत हे आंबे बाजारात उपलब्ध असतात. त्यानंतर काही किरकोळ बागायतदार आंबे बाजारात विक्रीसाठी ठेवतात. आंब्या विक्रेत्यांकडे हे आंबे काही चढ्या दराने विकले जातात. म्हणजेच प्रतिडझन शंभर रुपये एवढा फरक पाहायला मिळतो.
हापूस आंब्यासोबतच बाजारपेठेमध्ये गोवा मानकूर, पायरी आंबाही दाखल झाला आहे. मानकूरला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगला दर मिळत आहे. सद्यस्थितीत सहाशे रुपये डझन दराने विकला जात आहे, तर पायरी चारशे रुपये मोठे फळ आणि लहान फळ तीनशे रुपये दराने विकले जात आहे. एकूणच हापूसपेक्षा मानकुरला चांगला दर मिळत आहे.
आंबा विक्रीतून मिळतोय रोजगार
सावंतवाडी बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी ठेवला आहे. आंबा विक्री करणारे महिला-पुरुष हे ग्रामीण भागातून सावंतवाडीत येत आहेत. बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात आंब्याची उचल करून त्यावर काहीसा ज्यादा दर लावून विक्रेते दिवसभर बाजारपेठेमध्ये हा व्यवसाय करत आहेत. दरवर्षी या व्यवसायातून रोजगार मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सद्यस्थितीत मुख्य बाजारपेठेमध्ये सर्वत्र आंबा विक्रीसाठी पाहायला मिळत आहे.
पर्यटकांकडूनही चांगली खरेदी
या आठवड्यात सलग तीन दिवस सुटी आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पर्यटकांकडून आंबे खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ दिसत आहे. आंबे विक्रेत्यांचाही यानिमित्ताने चांगला व्यवसाय होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
बाजारपेठेमध्ये दाखल झालेला हापूस आंबा हा पहिल्या टप्प्यातील असून, अजून दोन टप्प्यांतील आंबा पुढील काही दिवसांमध्ये दाखल होणार आहे; मात्र सद्यस्थितीत असलेला ४०० ते ६०० पर्यंतचा दर शेवटपर्यंत कायम राहणार आहे. उत्पादन कमी असल्याने हा दर टिकून राहणार आहे. हापूसपेक्षा गोवा मानकूरचे उत्पादन जिल्ह्यात कमी असल्याने आणि मागणी जास्त असल्याने मानकूरला चांगला दर मिळतो.
- मानसी सोन्सूरकर, आंबा बागायतदार, आडेली