इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा ४७ वा सामना १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गाजवला. त्याने शतक ठोकत राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
सोमवारी (२८ एप्रिल) जयपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थानने विजय मिळवल्याने त्यांचे प्लेऑफ शर्यतीतील आव्हान अजूनही जिवंत राहिले आहे. हा राजस्थानचा १० सामन्यातील तिसरा विजय आहे.
या सामन्यात गुजरातने राजस्थानसमोर २०१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थान रॉयल्सने १५.५ षटकात २ विकेट्सच गमावत २१२ धावा करून पूर्ण केले. वैभवसोबतच यशस्वी जैस्वालचे योगदान महत्त्वाचे राहिले. त्यानेही अर्धशतक ठोकले.
या सामन्यात राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीला फलंदाजी केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याला दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वाल चांगली साथ देत होता. वैभवने १७ चेंडूत अर्धशतक केले. त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने नंतरही गुजरातच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळताना ३५ चेंडूत शतक ठोकले.
हे वैभवचे पहिले शतक तर आहेच, पण तो आयपीएल आणि टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही ठरला. त्याच्या खेळामुळे राजस्थानसाठी विजय सोपा झाला. पण शतकानंतर त्याला १२ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने त्रिफळाचीत केले. त्याने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि ११ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर नितीश राणाही १३ व्या षटकात ४ धावांवर राशीद खानविरुद्ध पायचीत झाला. पण नंतर जैस्वालला राजस्थानचा कर्णधार रियान परागने चांगली साथ दिली. जैस्वालनेही अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनीही नंतर राजस्थानचा विजय निश्चित केला. यशस्वी जैस्वाल ४० चेंडूत ७० धावांवर नाबाद राहिला. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. रियान परागने नाबाद ३२ धावा केल्या.
तत्पुर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ५० चेंडूत ८४ धावांची खेळी केली, तर जॉस बटलरने २६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. साई सुदर्शनने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. त्यामुळे गुजरातने २० षटकात ४ बाद २०९ धावा केल्या.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना महिश तिक्षणाने २ विकेट्स घेतल्या, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.