साजिरी जोशी आणि रोहन मापुसकर
लवकरच ‘१९ मे ९९’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन मापुसकर आणि प्रमुख अभिनेत्री साजिरी जोशी यांच्यात या चित्रपटाच्या प्रवासात एक सुंदर मैत्रीचं नातं जुळलं. रोहननं साजिरीला पहिल्यांदा चित्रपटासाठी कॉल केला, तेव्हापासून ते ‘साजिरी ऑन बोर्ड’ येईपर्यंतच्या प्रक्रियेत त्यांच्यात खऱ्या अर्थाने मैत्री निर्माण झाली. याच प्रवासात रोहनला साजिरी एक व्यक्ती म्हणून अधिक समजली आणि त्यांच्या नात्याला एक खास गोडी मिळाली. त्यांच्या मैत्रीबद्दलच्या भावना त्यांनी स्वतःच्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
रोहन म्हणाले, ‘‘साजिरी ही अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची मुलगी. लहानपणापासून मी तिला पाहतोय. एकदा चाइल्ड आर्टिस्टसाठी मी शोध घेत होतो, तेव्हा तिचं पहिलं ऑडिशन पाहिलं आणि तिच्यातील सहजता, डोळ्यातील भावना पाहून मी मनाशी ठरवलं होतं, की कधी ना कधी मी एक फिल्म करेन जिथे साजिरी असेलच. नंतर ‘१९ मे ९९’साठी साजिरीशी थेट संवाद साधला आणि त्या संवादातून आमचं नातं जुळायला सुरुवात झाली.
‘‘साजिरीच्या व्यक्तिमत्त्वातली प्रामाणिकता, तिचं डेडिकेशन मला खूप भावलं. अभिनयाचा वारसा तिला घरातून लाभलाय; पण स्वतःचा मार्ग ती स्वतःच्या मेहनतीनं आखतेय. तेरा वर्षांची साजिरी आणि आजची मॅच्युअर साजिरी यातला फरक पाहून खूप कौतुक वाटतं. ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्वतःच्या निर्णयात ठाम आहे आणि काम करताना पूर्णपणे समर्पित असते. मला वाटतं, तिच्या प्रामाणिक स्वभावामुळेच आमच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली. तिला नेहमी सांगतो, की काम निवडताना जसे विचारपूर्वक निर्णय घेतलेस, तसंच पुढेही कर. तिनं खरंच एक छान अभिनेत्री होऊन पुढे यावं आणि आमची ही रेशीमनाती मैत्री अशीच टिकावी, हीच इच्छा.’’
साजिरीनंही आपल्या भावना बोलून दाखवल्या. ती म्हणाली, ‘‘रोहन सर केवळ उत्कृष्ट दिग्दर्शक नाहीत, तर खूप चांगले माणूसही आहेत. ‘१९ मे ९९’ दरम्यानच आमची मैत्री झाली. या प्रवासात त्यांनी आम्हा कलाकारांना केवळ स्क्रिप्ट समजावली नाही, तर आमच्या भूमिकांमध्ये आमचा स्वतःचा अनुभव, स्वतःचं विचारस्वातंत्र्यही दिलं. ते कलाकारांना भूमिका साकारताना मोकळीक देतात, जे फार कमी दिग्दर्शक करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक सुंदर अनुभव होता. सर कलाकारांना अत्यंत कम्फर्टेबल करतात आणि खूप प्रेमानं मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवातून आम्हालाही अभिनयाचं बाळकडू मिळालं. ‘१९ मे ९९’ माझ्यासाठी खास आहे- कारण यामुळे मला केवळ एक सुंदर चित्रपटच नाही, तर आयुष्यभरासाठी काही खूप खास मित्र मिळाले आहेत.’’
मैत्रीची व्याख्या करताना रोहन म्हणाले, ‘‘मुलींचं माहेर असतं, सासर असतं; पण मुलांना फक्त मित्रच असतात. मित्रांमध्येच ते आपलं खरं आयुष्य जगतात. त्यामुळे माझ्यासाठी मैत्री म्हणजेच आयुष्याचा आधार.’’
(शब्दांकन : मयूरी गावडे)