रोहिणी खडसे: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या 12 वर्षीय वेदिका चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारला घेरले आहे. राज्यकर्ते महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायला निघालेत. पण, पाण्यासाठी एका बारा वर्षीय मुलीला जीव गमवावा लागतो आहे, आपल्या राज्याचे काय दुर्दैव आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे ज्यात त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक भाग जिथे महिलांची आणि लहान मुलींची पाण्याअभावी फरफट होते. महाराष्ट्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली ज्यात प्रचंड पैसा खर्च केला गेला पण या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात याच्या तक्रारी आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, ज्या गावात ही घटना घडली त्या गावातही या जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आली. पण, पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकीच बांधली नाही. फक्त पैसा कमावण्यासाठी ही कामे झाली आहे, ठेकेदारांना फायदा होण्यासाठी ही कामे केली जात आहे. तसेच ही योजना चांगल्याप्रकारे राबवली असतील तर त्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता, असं त्यांनी म्हटलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाणी आणण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय वेदिका चव्हाण हिचा पाय घसरून अरुणावती नदीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, वेदिकाच्या घरासमोर तसेच संपूर्ण वस्तीतील प्रत्येक घरासमोर गेल्या वर्षभरापासून सरकारी पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकलेली आहे. मात्र, अद्याप त्या पाइपलाइनला नळ जोडून पाणीपुरवठा सुरू करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. या वस्तीतील एकमेव हँडपंपसुद्धा मागील चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असून त्याची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे वस्तीतील महिला, पुरुष आणि लहान मुलांना रोज दीड किलोमीटरचा प्रवास करून अरुणावती नदीतून पाणी आणावे लागते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जर प्रशासनाने वेळेवर पाण्याची व्यवस्था केली असती, तर वेदिकाचा जीव वाचू शकला असता. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..