मंचर : “हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) मीना व घोड कालव्यात पाणी सोडावे. असे पत्र पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. त्यानुसार अहिल्यानगर येथे सोमवारी (ता.५) संध्याकाळी विखे पाटील यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. कालव्यात पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.” असा विश्वास माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद बँकेच्या सभागृहात रविवारी (ता.४) झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राजेंद्र गावडे, प्रकाश घोलप व दादाभाऊ पोखरकर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, “डिंभे धरणात १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. या परीस्थितीत गुरांचा चारा वाचविण्यासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वेळेवर कालव्यातून पाणी मिळावे म्हणून शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी पाऊस कधी पडेल सांगता येत नाही. अनेक गावात पाण्याचे टँकर सुरु आहेत. त्यांना कुकडी प्रकल्पातील पाणी वेळेत मिळावे ही माझी ठाम भूमिका आहे.”
डाव्या कालव्यातून घोड कालव्यात पाणी सोडावे या मागणीसाठी शनिवारी (ता.३) काही कार्यकर्त्यांनी कळंब येथील घोड कालव्यात बसून आंदोलन केल्याचे पत्रकारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनात आणून दिले. या संदर्भात वळसे पाटील म्हणाले, “काही तरी कृत्य करून फोकस मध्ये रहाणे मला पसंत नाही.
घोड कालवा- बारा गावे. ओलिताखाली येणारे क्षेत्र : चार हजार ६०० हेक्टर.
मीना कालवा- २० गावे. ओलिताखाली येणारे क्षेत्र : १६ हजार हेक्टर.
“दहा वर्षापूर्वी मी अनकेदा जाहीरपणे सांगितले होते की, यापुढे पाणी प्रश्नावरून गावागावात, तालुक्यात व जिल्ह्यात भांडणे होतील. यापार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी प्रसार माध्यमांनी शेतकऱ्यांमध्ये व गावामध्ये जनजागृती करावी. पाणी प्रश्नासाठी मतदारसंघातील जनतेबरोबर व शेतकऱ्यांबरोबर मी सदैव खंबीरपणे उभा आहे.”
- दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री.