पाकिस्तानचा सरकारपुरस्कृत दहशतवाद भारताला गेली कित्येक वर्षे भेडसावतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा हा भेसूर चेहरा उघड करण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केला. जगातून दहशतवादाचे उच्चाटन व्हावे, असे बहुतेक देश सांगत असतात. पण म्हणून या मुद्यावर पाकिस्तानबरोबरच्या लढाईत हे देश नेमकी काय भूमिका घेतील? अनेकांच्या मनात याविषयीचे प्रश्न आहेत. अमेरिकेला स्वारस्य आहे ते भारताने शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रप्रणाली आपल्याकडून विकत घ्यावीत, यात. रशिया स्वतःच युक्रेन युद्धात गुंतलेला आहे. त्यामुळे त्या देशाच्या दृष्टीने तो प्रश्न महत्त्वाचा असणार. चीन आपला अजेंडा कसा रेटता येईल आणि भारताला त्रास कसा होईल, हे पाहील. भारताच्या पाकिस्तानवरील संभाव्य लष्करी कारवाईमुळे आर्थिक हितसंबंध बाधित होण्याच्या चिंतेतून चीनने पाकिस्तानला ‘पीएल-१५’ क्षेपणास्त्रे पुरविली आहेत. विविध इस्लामी देशांनी पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी त्याबद्दल अधिकृत निवेदन नाही. तुर्किये हा मुस्लीम देश काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानचे समर्थन करीत आला आहे.
पण गेल्या वर्षी भारतासोबत दहा अब्ज डॉलरचा व्यापार करणाऱ्या तुर्कियेचे पाकिस्तानसमर्थन कूटनीतिक विधानांपुरतेच मर्यादित राहील, अशी शक्यता दिसते. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी घेतलेली भूमिका संदिग्ध वाटते. भारताने मर्यादित स्वरूपात प्रतिकार करावा, असे त्यांनी म्हटले आहे. युद्ध चिघळता कामा नयेच. परंतु ज्या महासत्तेने खोटे कारण देऊन इराक उद्ध्वस्त केला, अफगाणिस्तानात युद्ध करून कोणतीही घडी न बसविता काढता पाय घेतला, जपानवर अणुबॉम्ब टाकून भयानक विनाश घडवून आणला आणि व्हिएतनाम युद्धातही कोणतेही उद्दिष्ट साध्य न करता लाखो लोकांची जीवितहानी आणि शेकडो एकर जमीन उजाड केली, त्या अमेरिकेला भारताला असा उपदेश करण्याचा नैतिक अधिकार नाही. ९/११ च्या हल्ल्यानंतर ‘जागतिक दहशतवादविरोधी लढा’ हा शब्दप्रयोग अमेरिकेने वापरला. ‘आपलं जळतं तेव्हा कळतं’ याचेच ते द्योतक होते. परंतु त्यानंतरच्या काळातील घडामोडी पाहता आता तो लढा ‘जागतिक’ राहिला आहे का? प्रत्येक जण आपापल्या हितसंबंधांतून त्याकडे पाहात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असताना कोण कसे वागते, यावर त्या ‘जागतिक’पणाची कसोटी लागेल.
भारतातील परिस्थितीचाही परामर्श घ्यायला हवा. समाजमाध्यमांबरोबरच काही प्रसारमाध्यमेही आपली ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडताहेत. युद्धात शत्रूला कमी लेखून चालत नसते, या वास्तवाचे भान माध्यमांना राहिलेले दिसत नाही. पाकिस्तानला तुच्छ लेखून युद्ध सुरू होण्यापूर्वीच जिंकल्याचा उन्माद निर्माण करण्याने भारताहित साधले जाणार आहे, असे कुणाला वाटत असेल तर ते पूर्णतः चुकीचे आहे. समाजमाध्यमांवर जे काही चालू आहे, तेदेखील चिंता निर्माण करणारे आहे. स्थानिक काश्मिरींच्या विरोधात बहिष्काराची आवाहने करण्यासारखे प्रकार आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार म्हणावा लागेल. कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मिरी जनता भारताशी पूर्वीपेक्षा अधिक एकरुप झाल्याचे किंवा त्या मार्गावर असल्याचे जाणवते आहे.
गेल्या पाच वर्षांंत जम्मू आणि काश्मीरला जाणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांची संख्या काही लाखांवरुन दोन कोटी ३० लाखांवर पोहोचली. त्यामुळे स्थानिक काश्मिरींच्या जीवनात अनेक वर्षांनंतर आर्थिक स्थैर्य आले. त्यातून निर्माण झालेले चित्र पाकिस्तानचा जळफळाट वाढवणारे ठरले. त्या जळफळाटातूनच पाकिस्तानने हा हल्ला घडवला आहे. पाकिस्तान काश्मीरबाबत करीत असलेला प्रचार किती खोटा आहे, याचाच पुरावा बदलत्या, विकासाभिमुख काश्मीरमधून मिळत होता. काश्मीर शांत, स्थिर होणे पाकिस्तानला परवडणारे नव्हते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात ठेवली पाहिजे. खातरजमा केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाशी संबंधित कोणत्याही माहितीची ढकलंपंची करणे चुकीचे आहे.
जणु काही आपणच युद्ध खेळत आहोत, अशा आविर्भावात आणि अभिनिवेशात संदेशवहन सुरू आहे. हे थांबायला हवे. हिंदू-मुस्लिम तणाव वाढून काश्मिरातच नव्हे तर भारतातही अस्थिरता माजावी, असाही दहशतवाद्यांचा आणि त्यांना पोसणाऱ्या शक्तींचा कट आहे, त्याला आपण बळी पडता कामा नये. अलीकडच्या युद्धात एक बाजू जिंकली आणि दुसरी हरली, इतका साधासोपा मामला राहिलेला नाही. गेल्या दोन दशकांमध्ये जगाने अफगाणिस्तान, इराक, सीरिया, युक्रेन, येमेन आणि गाझा पट्टीतील युद्धे अनुभवली आहेत.
या युद्धांमध्ये सुमारे चार कोटी लोक विस्थापित झाले. युक्रेनच्या युद्धात ८३ हजार तर इस्रायल-गाझा युद्धात ३३ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. सीरियाच्या युद्धात २०१६ पर्यंत चार लाख ७० हजार मृत्युमुखी पडले. इराक-अमेरिका युद्धात पाच लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला. पायाभूत सुविधांसह अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणे, व्यापार व उदरनिर्वाहात व्यत्यय, लष्करी खर्चात वाढ होणे, आरोग्यावर घाला घातला जाणे, यांसारख्या दुष्परिणामांची नोंद झाली आहे. या सगळ्याचे भान बाळगणे या घडीला फार महत्त्वाचे आहे.