PBKS vs LSG: ७ सिक्स, ६ फोर... प्रभसिमरन बरसला, पण शतक थोडक्यात हुकलं; पंजाबचे रिषभच्या लखनौसमोर मोठं लक्ष्य
esakal May 05, 2025 07:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (४ मे) दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात धरमशाला येथे खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सकडून पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली.

त्यातही प्रभसिमरन सिंगने तुफानी फलंदाजी केली. मात्र त्याचे शतक थोडक्यात हुकले. या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौसमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले होते. त्यामुळे पंजाब किंग्स प्रथम फलंदाजीला उतरले. त्यांच्याकडून प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीला फलंदाजी केली. पण प्रियांशला पहिल्याच षटकात आकाश सिंगने १ धावेवर बाद करण्यात यश मिळवले.

परंतु, नंतर प्रभसिमरनला जोश इंग्लिसने चांगली साथ दिली. इंग्लिस आक्रमक खेळत होता. पण त्याची विकेट अखेर पाचव्या षटकात आकाशनेच घेतली. इंग्लिसने १ चौकार आणि ४ षटकारांसह ३० धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर प्रभसिमरनला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली. अय्यरही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानेही आक्रमक पवित्रा घेतला. त्याच्यात आणि प्रभसिमरनमध्ये ७८ धावांची भागीदारी झाली.

पण अय्यरला अर्धशतकासाठी ५ धावांची गरज असताना १३ व्या षटकात दिग्वेश राठीने मयंक यादवच्या हातून झेलबाद केले. अय्यरने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या.

तरी प्रभसिमनर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. त्याने अर्धशतक पूर्ण केले होते. पण नेहल वढेरा १६ धावांवर बाद झाला. मात्र नंतर शशांक सिंगची साथ त्याला मिळाली. प्रभसिमरन आणि शशांक यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पंजाबने २०० धावांचा टप्पा सहज पार केला होता.

मात्र १९ व्या षटकात प्रभसिमरनचा अडथळा दिग्वेश राठीने दूर केला. निकोलस पूरनने त्याचा झेल घेतला. प्रभसिमरनने ६ चौकार आणि ७ षटकारांसह ४८ चेंडूत ९१ धावांची खेळी केली.

शेवटच्या षटकात शशांक सिंग आणि मार्कस स्टॉयनिसने आक्रमक खेळत संघाला २० षटकात ५ बाद २३७ धावांपर्यंत पोहचवले. शशांक सिंग १५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावांवर नाबाद राहिला. स्टॉयनिस ५ चेंडूत १५ धावांवर नाबाद राहिला.

लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच प्रिन्स यादवने १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.