छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नविन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली आहे. येत्या महिनाभरात या कामाचा डीपीआर तयार करण्यात येत असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड यांनी रेल्वेस्थानकावर दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे व संबंधीत अधिकाऱ्यांची प्रदिर्घ बैठक घेतली. बैठकीत विविध अधिकाऱ्यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण करत माहिती दिली. बठकीनंतर डॉ. कराड यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हा नविन रेल्वेमार्ग व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत होता. खासदार भागवत कराड यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे. आढावा बैठकीत मध्य रेल्वेचे अभियंता राज नारायण यांनी सविस्तर माहिती दिला. या नविन मार्गासाठी तीन सर्वे करण्यात आले, त्यापैकी तीसरा सर्वे अंतिम करण्यात आला.
नऊ रेल्वेस्थाकांचा सामावेशछत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या ८५ किलोमीटर अंतराच्या नविन रेल्वेमार्गासाठी ३ हजार २३८ कोटी रुपयांचे हे काम राहणार आहे. यासाठी ६४० हेक्टर म्हणजे अंदाजे १५८३.४७ एकर जमिनीचे अधिगृहण करण्यात येणार आहे. या मार्गात छत्रपती संभाजीनगर, शरणापूर, अंबेगाव, येसगाव, गंगापूर, देवगड, नेवासा, उस्थल दुमला, शनि शिंगणापूर, आणि वांभोरी हे रेल्वेस्टेशन राहणार असल्याचे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र यामध्ये रांजणगाव घ्यावे अशी सुचना डॉ. कराड यांनी केली. त्यामुळे रांजणगाव हे स्टेशन सामाविष्ट करुन त्याचा १५ मे पर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार आहे. डीपीआरला मंजूरी मिळाल्यानंतर नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची बैठक होउन मंजूरी मिळेल त्यानंतर निविदा प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या बैठकीला दमरेचे विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले, गतिशक्ती योजनेचे अभियंता जी. सी. निमजे, सिकंदराबादचे अभियंता हेमंत भगोरिया, प्रकाश प्रजापत, मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर १६ बोगींची पिटलाइन करण्यात येत आहे. ही रेल्वेलाईन वाढवून १८ बोगींची करण्यासाठी मनमाडच्या दिशेने रेल्वे स्टेशनपासून १०० मीटरवरील असलेल्या रेल्वेच्या जागेवरील ७० घरांचे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. या अतिक्रमण धारकांना तीन वेळा नोटीस दिल्यानंतर हे अतिक्रमण हटवण्यात येईल असे विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी सांगितले. महापालिकेच्या मदतीने या संदर्भात पुढील प्रक्रिया केली जाईल. हा विषय सुरू असताना महापालिकेचे अभियंता बैठकीच्या मधूनच निघून गेल्याचे समजताच डाॅ. कराड संतापले.