RR vs LSG Live: संजू सॅमसनशिवाय राजस्थान मैदानात! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी; दोन वेळा उडवाला लागला टॉस
esakal April 20, 2025 06:45 AM

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Marathi Update: राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आव्हान टीकवण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. त्यांच्यासमोर आज गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे. RR ने मागील तिन्ही सामने गमावले आहेत आणि ही मालिका खंडित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आले. कर्णधारला दुखापतीमुळे मागच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले होते. तो आजच्या सामन्यालाही मुकला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत २२ वर्षीय रियान पराग आज संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

लखनौकडून निकोलस पूरन मैदान गाजवतोय आणि त्याला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १ धाव हवी आहे. पण, जोफ्रा आर्चरचे त्याच्यासमोर आव्हान आहे. राजस्थानच्या गोलंदाजाने त्याला तीनवेळा बाद केले आहे आणि त्याच्याविरुद्ध पूरनची सरासरी ही १३ एवढी कमी राहिली आहे. तेच RR च्या नितीश राणाला LSG च्या आवेश खानने पाच डावांत दोनवेळा बाद केले आहे. रियानच्या नेतृत्वाखाली ने यंदाच्या पर्वातील सुरूवातीच्या तीनपैकी दोन सामन्यांत हार पत्करली आहे.

लखनौने सातपैकी चार सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. रिषभ पंतचा फॉर्म हा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेली असली तरी अन्य फलंदाज दमदार कामगिरी करत आहेत. निकोलस पूरनने यंदाच्या पर्वात ३५७, मिचेल मार्शने २९५ व एडन मार्करमने २०८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर ( ११ विकेट्स), दिग्वेश राठी ( ९) व रवी बिश्नोई ( ८) हे छाप पाडत आहेत.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, वनिंदू हसरंगा व महिशा थीक्षणा यांनी प्रत्येकी ७ विकेट्स घेऊन चांगली टक्कर दिली आहे. फलंदाजीत यशस्वी जैस्वालला आता कुठे सूर गवसला आहे आणि सलग तीन अर्धशतकांसह त्याने आतापर्यंत २३३ धावा केल्या आहेत. त्यानंतर २२४ धावा करणाऱ्या संजूचा क्रमांक येतो, पण तो आज खेळणार नाही. आजच्या सामन्यात १३ वर्षीय वैभवला पदार्पणाची संधी दिली गेली. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्स संघाने १ कोटी १० लाख रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते.

रिषभ पंतने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. १४ वर्षीय वैभवचे पदार्पण होत असल्याचे रियानने सांगितले. पण, त्याला इम्पॅक्ट खेळाडूच्या लिस्टमध्ये ठेवले गेले आहे. दरम्यान, दोनवेळा टॉस उडवावा लागला, कारण रिषभ पंतने हेड की टेल काय म्हटलं हेच कळलं नव्हतं आणि दोन्ही वेळेस रिषभ हेड म्हणालेला, असे समालोचक सांगत होते. दोन्ही वेळेस हेड आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.