राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण : राज-उद्धव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
प्रतिनिधी / मुंबई
आमच्यातले वाद, भांडणे छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणे, एकत्र राहणे कठीण नाही, असे मोठे विधान करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. पण माझी एक अट असेल, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. या ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या संकेतामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे मागील अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचा पेंद्रबिंदू असलेल्या ठाकरे कुटुंबात एकजूट होणार का, अशी चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे.
आमचे वाद छोटे, महाराष्ट्र मोठा : राज ठाकरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या fिशवसेनेसोबतच्या युतीवर मोठे विधान केले आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले?
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असे वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा
आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असे वाटते, लार्जर पिक्चर बघणे गरजेचे आहे, असे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असे विधानही राज ठाकरेंनी केले आहे.
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार : उद्धव ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा टाळी देण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट जाहीरपणे टाळी देत एक प्रकारे मनसे युतीचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्याकडून जी भांडणं असतील (ती नव्हतीच असेही त्यांनी नमूद केले) ती मिटवली, असे म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे, पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचे सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे असे नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचे आगत स्वागत करणार नाही, हे पहिले ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.
मुंबई आणि मराठी माणसासाठी एकत्र यावेच लागेल : संजय राऊत
राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावेच लागेल असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केले. राज ठाकरेंनी आता कुठे मन मोकळं केलं, त्याला आम्ही प्रतिसाद दिला. आता आम्ही वाट बघतोय असंही सूचकपणे संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आहेत, ही रक्ताची नाती आहेत असं सांगत संजय राऊतांनी एक प्रकारे राज ठाकरेंना युतीसाठी साद घातल्याचं दिसतंय.
2014 आणि 2017 रोजी राज ठाकरेंना धोका दिला : मनसे नेते संदीप देशपांडे
दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावे अशी साद खासदार संजय राऊत यांनी घातल्यानंतर मनसेच्यावतीने त्याला उत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी या आधी राज ठाकरेंना 2014 आणि 2017 साली धोका दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. आता आम्हाला नैतिकता शिकवण्रायांकडेच नैतिकता शिल्लक राहिली आहे का हे पाहावे लागेल असाही टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.