‘टेंट सिटी’चे साहित्य बेचिराख : कोट्यावधींचे नुकसान, सिलिंडर्सचाही स्फोट
Vrtasantha/ Prigaagraj
उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात तंबूच्या माध्यमातून ‘टेंट सिटी’ साकारणाऱ्या लल्लूजी यांच्या गोदामात शनिवारी सकाळी भीषण आग लागली. सदर गोदामात 5 लाख बांबूच्या काठ्या, तंबूंचे पडदे, रजाई आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. या गोदामात काही मिनिटांतच आगीने भयानक रूप धारण केले. तसेच गोदामात ठेवलेले सिलिंडर फुटू लागल्यामुळे आगीच्या ज्वाळा 3 किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसत होत्या. नुकत्याच झालेल्या महाकुंभातील तंबूंची जबाबदारी लल्लूजी अँड सन्स कंपनीकडे होती. ही कंपनी 104 वर्षांपासून वाळूवर तंबू शहरे बांधत आहे.
गोदामाला लागलेल्या आगीमुळे पोलिसांनी 2 किलोमीटरचा परिसर सील केला. आगीच्या विळख्यात सापडलेले गोदाम शास्त्राr पुलाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही सतर्क करण्यात आले. प्रयागराजचे जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले. तसेच प्रयागराज अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. याशिवाय, जवळच्या जिल्ह्यांमधून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. आगीदरम्यान उष्णता इतकी तीव्र होती की अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर फोड आले होते.
आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी 6.30 वाजता कामगार गोदामात एका लहान सिलिंडरवर जेवण शिजवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचा दावा केला जात आहे. आगीच्या ज्वाळा पाहून गोदामात झोपलेले कर्मचारी आणि आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना तातडीने यश आले नाही. त्यांनी बादल्या आणि पाईपमधून पाणी ओतण्यास सुरुवात केली, परंतु आग वेगाने वाढत असल्याचे पाहून लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.
लल्लूजींचा व्यवसाय
लल्लूजी अँड सन्सचे प्रयागराजमधील परेड ग्राउंड, रामबाग, झुंसी आणि नैनी येथे तसेच देशभरात कार्यालये आणि गोदामे आहेत. ही कंपनी हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे होणाऱ्या मेळ्यांमध्ये तंबू साकारते. कंपनीची दिल्ली, उज्जैन, हरिद्वार आणि अहमदाबाद येथेही केंद्र्रे आहेत. 2025 च्या महाकुंभासाठी लल्लूजी कंपनीने देशातील 6 शहरांमधून वस्तू मागवल्या होत्या. कुंभमेळ्यादरम्यान, कापडी तंबूपासून ते बांबूच्या खांबांपर्यंत, पोलीस स्टेशन आणि चौक्यांपर्यंत सर्व काही बनवण्याची जबाबदारी लल्लूजींच्या कंपनीवर होती.