आज मी एका खऱ्याखुऱ्या घटनेची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट तशी छोटीच आहे, पण खूप महत्त्वाची! मध्य-पूर्व आशिया मधे वसलेल्या इराक या देशात घडलेली ही गोष्ट. इराकच्या वाळवंटात समुद्रकिनारी एक मोठं शहर वसलेलं आहे. त्या शहराचं नाव ‘बसरा’. या शहरात एक मोठं ग्रंथालय होतं. बसराचं मध्यवर्ती ग्रंथालय. ‘आलिया मोहम्मद बकर’ ही होती त्या ग्रंथालयाची ग्रंथपाल!
बसरा शहरातल्या लोकांना विशेषतः तिथल्या पुस्तकप्रेमींना हे ग्रंथालय खूप आवडायचं. सगळी मंडळी इथे जमत आणि जगभरातल्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत. जगात घडणाऱ्या घडामोडींपासून ते आत्मा-परमात्मा अशा आध्यात्मिक चर्चासुद्धा तिथे होत. असं एकूण चांगलं, मोकळं, विचारांना प्रवृत्त करणारं वातावरण लोकांना आलियाच्या या ग्रंथालयामुळे अनुभवायला मिळत असे. ग्रंथालयं असतातच तशी.
पुस्तकांच्या रूपाने, अफाट माहितीचा, वेगवेगळ्या कल्पनांचा, निरनिराळ्या लोकजीवनांचा खजिना असतो तिथे! किती तरी भिन्न, आपल्यापासून दूर असलेल्या खऱ्या आणि कल्पनेच्याही दुनियेत डोकावून बघता येतं आपल्याला! पण आताशा बसराच्या ग्रंथालयातलं हे वातावरण बदलू लागलं होतं. आताशा म्हणजे २००३ साली, जेव्हा इराकमध्ये युद्ध सुरू झालं होतं. आता लोकांच्या चर्चेत केवळ एकच विषय होता, तो म्हणजे-युद्ध.
‘बॉम्बने भरलेली विमानं आकाशात घिरट्या घालतील का?’
‘आपल्यावर बॉम्बचा वर्षाव होईल का?’
‘आपल्या जीवाला धोका निर्माण होईल का?’
‘काय वाढून ठेवलं आहे आपल्या भविष्यात?’अशी वाक्य कानावर
पडत होती.
या सगळ्यापेक्षाही आलियाला मात्र तिच्या पुस्तकांची, ग्रंथालयाची काळजी होती. युद्धामुळे पेटलेल्या आगीत आपली पुस्तकं भस्मसात झाली तर? ग्रंथालयातील विविध भाषांमधली प्राचीन आणि समकालीन पुस्तकं, मोहम्मदचा सातशे वर्ष जुना ग्रंथ, स्पॅनिश भाषेतलं कुराण, इत्यादी हे सगळं वैभव उद्ध्वस्त झालं तर? नाही, नाही! काही तरी करायलाच हवं. ग्रंथालयातली सगळी पुस्तकं सुरक्षित जागी हलवण्यासाठी आलियाने बसराच्या महापौरांची परवानगी मागितली, पण त्यांनी तिला मदत करण्यास साफ नकार दिला.
‘आता यासाठी मलाच काहीतरी करायला हवं’ असा आलियाने विचार केला आणि मग ती रोज ग्रंथालयातलं दिवसभराचं काम आटोपून रात्रीच्या वेळी पुस्तकं स्वतःच्या गाडीत भरून लपवून घरी न्यायला लागली. आतापर्यंत होणारी कुजबुज संपून आता खरोखरच युद्धाचे वारे वाहू लागले होते.
सरकारी अधिकाऱ्यांनी बसराच्या या मध्यवर्ती ग्रंथालयावर ताबा मिळवला. गणवेशधारी, बंदूक घेतलेले सैनिक, गच्चीवर पहार देऊ लागले. काहीतरी महाभयंकर घडणार आहे अशी भीती आलियाच्या मनात मूळ धरू लागली.
काही काळानंतर, या अफवा खऱ्या ठरू लागल्या आणि ६ एप्रिल २००३ ला बसरा शहरात युद्धाला तोंड फुटलं. बॉम्बमुळे अख्ख्या शहराने पेट घेतला. सतत होणाऱ्या गोळीबारामुळे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आणि धुराने संपूर्ण आकाश व्यापून टाकलं होतं. कोणत्याही युद्धाचं असतं, तसंच क्रूर, अमानवी आणि भयाण असं चित्र होतं ते. असं चित्र जे कितीही प्रयत्न केला तरी काळाच्या पडद्यावरून आणि ते अनुभवलेल्यांच्या मनातून कधीच पूर्णपणे पुसून टाकलं जाऊ शकत नाही.
बसराचे नागरिक आपला जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. हळूहळू ग्रंथालयातले कर्मचारी, सरकारी नोकर आणि सैनिकसुद्धा तिथून पळून गेले. आलिया मात्र तिथेच थांबली होती. तिच्या मनात ‘पुस्तकं कशी बरं वाचवता येतील?’ एवढा एकच विचार होता.
ग्रंथालयाच्या भिंतीला लागूनच एक हॉटेल होतं. हॉटेलचं नाव होतं ‘हमदान’ आणि त्याचा मालक होता ‘अनीस मोहम्मद.’ अनीस आलियाचा मित्र होता. आलियाने त्याला विचारलं, ‘तू मला पुस्तकं वाचवायला काही मदत करू शकशील का?’ अनीसलासुद्धा पुस्तकं वाचवली पाहिजेत असं मनापासून वाटत होतं. त्याने ताबडतोब हालचाल सुरू केली.
‘पडद्यांमध्ये काही पुस्तकं बांधता येतील’, ‘या पेट्यांमध्ये काही ठेवता येतील’, ‘या पिशव्यांचासुद्धा उपयोग होऊ शकेल’.. अशी चर्चा झाली. मग रात्रभर, आलिया, अनीस, अनीसचे भाऊ, दुकानदार आणि शेजारीपाजारी सगळ्यांनी मिळून ग्रंथालयातली फळ्यांवरची सगळी पुस्तकं खाली काढली आणि सात फुटी भिंतीवरून पलीकडे अनीसच्या हॉटेलमध्ये नेऊन लपवली.
पुस्तकं सुरक्षित जागी पोहोचल्याच्या ९ दिवसानंतर ग्रंथालयाला आग लागली आणि ते जळून नष्ट झालं. आलियाला माहीत होतं, की पुस्तकं कायमस्वरूपी अनीसच्या हॉटेलमधे ठेवता येणार नाहीत. युद्ध थंडावल्यावर तिने एक ट्रक भाड्याने घेतला आणि पुस्तकं त्यात भरून तिच्या स्वतःच्या आणि इतर मित्रमंडळींच्या घरी नेऊन ठेवली. किती पुस्तकं होती माहितीय? जवळ जवळ तीस हजार! म्हणजे ग्रंथालयाचा ७०% भाग!
आता आलियाच्या घरात पुस्तकांशिवाय इतर कोणत्याही गोष्टींसाठी जागाच उरली नव्हती. आलियाची ही गोष्ट जगापुढे पहिल्यांदा आणली ती न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार शैला दिवाण यांनी. हे मूळ पुस्तक आणि त्यातली रेखाटने जेनिट विंटर यांची आहेत.
याचा मराठी अनुवाद आभा भागवत यांनी केला असून, अनुवादित पुस्तकातली चित्र अविनाश देशपांडे यांची आहेत जी मूळ चित्रांवर आधारलेली आहेत. कजा कजा मरू प्रकाशन व गरवारे बालभवन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
पुढे २००४ मधे हे ग्रंथालय पुन्हा उभं राहिलं आणि मुख्य ग्रंथपाल म्हणून आलियाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. १३ ऑगस्ट २०२१ रोजी कोव्हिडच्या साथीत आलिया बकर यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट वाचल्यावर मला आलिया ‘हीरो’ वाटू लागली! पण एवढी युद्धाची धुमश्चक्री चालू असताना, माणसं जीवानीशी मारली जात असताना, पुस्तकं वाचवणं आलियाला का महत्त्वाचं वाटलं असावं?
युद्धामध्ये फक्त इमारती, घरं, शरीरं मोडून पडत नाहीत, तर माणसांचं धैर्य, मनोबल, त्याने घडवलेली संस्कृती यांचाही नाश होतो आणि माणसं परत उभी राहायची असतील तर पुस्तकं हवीत, पुस्तकातले विचार हवेत हे आलियाला समजलं असावं. बंदुकींनी नाही, तर पुस्तकांनी घडेल, वाचेल, सुरक्षित राहील हे जग असं तिला वाटत असावं. खरं तर तिने पुस्तकं नाही, तर पुढच्या पिढीचं भविष्य वाचवलं आहे.
अशा या, बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या, संवेदनशील ग्रंथपाल आलियाचं शांत, विवेकी, समाधानी जगाचं स्वप्न लवकर पूर्ण होवो!