Amarnath : रासायनिक कंपनीला भीषण आग, एकामागे एक स्फोट, अंबरनाथमध्ये भीतीचे वातावरण
Saam TV April 20, 2025 03:45 PM

अजय दुधाणे, अंबरनाथ प्रतिनिधी

Amarnath fire update : अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एमआयडीसीत स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीत पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केलं जातं. या कंपनीत शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान आग लागली. कंपनीत केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली आणि कंपनीत मोठमोठे स्फोट होऊ लागले.

मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने कुणालाही इजा झालेली नाही. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आज विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी 9 वाजताच्या सुमारास फोमचा मारा केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. दरम्यान, या आगीनंतर कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या कंपनीकडे इन ऑरगॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन लायसन्स असून त्यामध्ये ज्वलनशील रसायनांचा समावेश नसतो.

मात्र तरीही कंपनीने डाय इथाईल ऑगझोलेट, इथाईल अल्कोहोल यांसारखे ज्वलनशील ऑरगॅनिक केमिकल कंपनीत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपनीत मूळ उत्पादन सोडून दुसरंच उत्पादन सुरू होतं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि अग्निशमन दलाच्या पाहणीनंतरच आगीमागचं नेमकं कारण आणि नेमकी कोणत्या रसायनांमुळेही आग लागली, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.