Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरी यांना डॉक्टरेट
esakal April 20, 2025 03:45 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टरेट (डी. एस्सी., डॉक्टर ऑफ सायन्स) प्रदान करण्यात आली.

विद्यापीठातर्फे आयोजित २६ व्या दीक्षांत समारोहामध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे गडकरी यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे शनिवारी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. इंद्र मणी यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक सोहळ्यात ही डॉक्टरेट प्रदान केली.

जल संवर्धन, जैव इंधन विकास, जैविक आणि प्राकृतिक शेती, कृषी विविधीकरण आणि ग्रामीण विकासामध्ये गडकरी यांच्या अमूल्य योगदानासाठी ही डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

यापूर्वी देखील गडकरी यांना महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम राज्यातील विद्यापीठांनी डॉक्टरेटने गौरविले आहे. यामध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उत्तर प्रदेश येथील गलगोटियाज विद्यापीठ, गुवाहाटी येथील आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ, गाझियाबाद येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.