Mumbai Indians take on Chennai Super Kings at Wankhede Stadium : एकमेकांविरुद्ध खेळून यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या परतीच्या टप्प्यातील लढत होत आहे. प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या या दोन पारंपरिक संघातील लढतीला आयपीएल क्लासिको असे संबोधले जाते. या दोघांमधला थरार आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
मुंबईने घरच्या मैदानावरचे सर्व सामने जिंकले आहेत, त्यामुळे हीच विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी त्यांचे पारडे जड आहे; परंतु याच चेन्नईविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर प्रत्येकी सात सामन्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असताना चेन्नईचा संघ तळात आहे तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.
हुकमी फलंदाज रोहित शर्मा अपयशी ठरत असला तरी मुंबईने आपल्या गेल्या सलग दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. सलग पाच पराभवांनंतर चेन्नईने लखनऊ संघाचा पराभव करून पुन्हा विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई संघाला हळूहळू लय सापडत आहे आणि मुख्य म्हणजे डावपेचांची अचूक आखणी व त्याची योग्य अंमलबजावणीचे सूत्र त्यांना सापडले आहे. याच सूत्राच्या जोरावर त्यांनी धोकादायक हैदराबाद संघाला सहज पराभूत केले होते.
मुंबई-हैदराबाद सामना झालेली वानखेडेवरील खेळपट्टी नेहमीपेक्षा वेगळी होती. चेंडूला फिरकही मिळत होती तसे वेगवान गोलंदाजांचे चेंडू थांबून येत होते. या संधीचा फायदा बुमरा आणि कंपनीने अचूक उचलला आणि वेगात बदल करून हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांची नाकेबंदी केली होती. आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, याचे भाकीत वर्तवणे कठीण आहे; परंतु चेन्नईकडे असलेल्या फिरकी गोलंदाजांची क्षमता पाहता फिरकीस साथ देणारी खेळपट्टी असण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नईकडे असलेला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमद सर्वाधिक १२ विकेट मिळवून पर्पल कॅपचा मानकरी आहे. तसेच त्याने मुंबईविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात तीन विकेटही मिळवल्या होत्या. त्याच्या साथीला आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा असे फिरकी गोलंदाज चेन्नईच्या ताफ्यात आहेत.
दिल्ली त्यानंतर हैदराबाद यांच्याविरुद्धचे सामने मुंबईने जिंकलेले असले तरी फलंदाजीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. त्यासाठी रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित दोन-चार फटके चांगले मारून आशा निर्माण करीत आहे; परंतु तो कोणत्याही क्षणी बाद होण्याचा धोका असतो, त्यामुळे मुंबईला भक्कम सलामी मिळालेली नाही. या आयपीएलमधील सात सामने झाले असले तरी रोहितने अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत.