इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२० एप्रिल) दुपारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभवाचं पाणी पाजलं. मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात बंगळुरूने पंजाबला ७ विकेट्सने पराभूत करत हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली आहे.विशेष म्हणजे ८ सामन्यांपैकी बंगळुरूने जे ५ सामने जिंकले आहेत, ते सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या मैदानात जिंकले आहेत.
या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा तिन्ही विभागात पंजाबपेक्षा वरचढ कामगिरी केली. तसेच या सामन्यात विजय मिळवत दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारी (१८ एप्रिल) पंजाबकडून घरच्या मैदानात झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.
रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १८.५ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी शानदार अर्धशतकं झळकावली.
बंगळुरूकडून सलामीला फिल सॉल्ट आणि उतरले होते. पण पहिल्याच षटकात सॉल्टला अर्शदीप सिंगने जॉस इंग्लिसच्या हातून झेलबाद करत एकाच धावेवर माघारी धाडले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याला विराटकडून तोलामोलाची साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी करत बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला.
पडिक्कलने अर्धशतकही झळकावलं.पण अखेर १३ व्या षटकात त्याला हरप्रीत ब्रारने माघारी धाडलं. पडिक्कलने ३५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली, या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर विराट कोहलीने जबाबदारी खांद्यावर घेतली आणि धावगती कायम ठेवली. त्यानेही शेवटी आक्रमक शॉट्स खेळले.
विराटचेही अर्धशतक पूर्ण झाले. त्याचे हे यंद्याच्या आयपीएल हंगामातील ८ सामन्यांमधील चौथे अर्धशतक आहे. त्याला कर्णधार रजत पाटिदाही साथ देत होता. पण पाटिदारला १७ व्या षटकात युजवेंद्र चहलने मार्को यान्सिनच्या हातून १२ धावांवर माघारी धाडले.
पण नंतर विराट आणि जितेश शर्माने उर्वरित धावा पूर्ण करत बंगळुरूचा विजय निश्चित केला. जितेशने १८ व्या षटकाच विजयी षटकात खेचला. विराट ५४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांवर नाबाद राहिला. जितेश ८ चेंडूत ११ धावांवर नाबाद राहिला.
पंजाब किंग्सकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५७ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने १७ चेंडूत ३३ धावांची सर्वोच्च खेळी केली.
प्रियांश आर्यने १५ चेंडूच २२ धावा केल्या. जोश इंग्लिसने १७ चेंडूत २९ धावा केल्या. शशांक सिंग ३३ चेंडूत ३१ धावांवर आणि मार्को यान्सिन २० चेंडूत २५ धावांवर नाबाद राहिला. मात्र, पंजाबकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.
बंगळुरूकडून कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर रोमरियो शेफर्डने १ विकेट घेतली.