“कर्णधार म्हणून शुबमन गिलचे भविष्य…” दिग्गज फिरकीपटूचे मोठे वक्तव्य!
Marathi April 21, 2025 09:27 PM

यंदाच्या आयपीएल हंगामातील 39वा सामना आज (21 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध गुजरात टायटन्स (KKR vs GT) संघात खेळला जाईल. यासाठी दोन्ही संघ कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आमने-सामने असतील. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केलं आहे. गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सची कामगिरी आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे. गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. राशीद खान देखील गिलच्या नेतृत्वावर पूर्णपणे समाधानी असल्याचे दिसते. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी, राशीदने गिलबद्दल एक मोठे विधान करत म्हटले की शुबमनचे नेतृत्व म्हणून खूप उज्ज्वल भविष्य आहे.

जिओ हॉटस्टारवर गिलबद्दल बोलताना राशीद म्हणाला, “शुबमनचे भविष्य एक कर्णधार म्हणून खूप उज्ज्वल आहे, फक्त एक फलंदाज म्हणूनच नाही तर तो ज्या पद्धतीने विचार करतो आणि खेळ कसा समजून घेतो या बाबतीतही. तो प्रत्येक सामन्यात एका योजनेसह जातो. तो खूप शांत आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला मैदानावर पाहता आणि तो संघ, गोलंदाज आणि संपूर्ण वातावरण कसे व्यवस्थापित करतो तेव्हा मला वाटते की त्याच्यात एक महान नेता बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.”

पुढे बोलताना राशीद म्हणाला, “तो इतक्या मोठ्या लीगमध्ये कर्णधारपद भूषवत आहे आणि मला वाटते की येथे दबाव विश्वचषकापेक्षाही जास्त आहे. दबावाखाली कामगिरी करण्याची आणि धाडसी निर्णय घेण्याची कर्णधार म्हणून ही त्याच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.”

शेवटी बोलताना तो म्हणाला, “मी या संघात सामील झाल्यापासून, कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंनी माझे खूप चांगले स्वागत केले आहे. 5 वर्षांपूर्वी मला कधीच असे वाटले नव्हते की मी दुसऱ्या संघासाठी खेळलो आहे. तेव्हापासून कौटुंबिक वातावरण तयार झाले आणि मी खेळाचा आनंद घेऊ लागलो. चेंडू आणि बॅटसह माझी कामगिरी सुधारली आणि मला अधिक संधी मिळाल्या. जेव्हा तुम्ही संघात असता तेव्हा तुम्हाला काही जबाबदारी मिळणे आणि प्रत्येक गोष्टीवर खुलेपणाने चर्चा होणे खूप महत्वाचे आहे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.