शिरूर, ता. २१ : शहरातील ढोरआळी परिसरात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू न शकल्याने शिरूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रिशिका विशाल जाधव (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, त्यांचे पती विशाल यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल जाधव हे टेंपोवर चालक म्हणून काम करीत असून, शुक्रवारी (ता. १८) सकाळी ते कारेगाव (ता. शिरूर) येथे कामावर गेले असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी रिशिका यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधून घरी कधी येणार? अशी विचारपूस केली होती. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता ते कामावरून घरी आले असता घरात पत्नी न दिसल्याने त्यांनी आईकडे विचारणा केली. त्यावर ती आजारी असल्याने दुपारपासून बेडरूममध्ये झोपली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर विशाल यांनी बेडरूमचा दरवाजा वाजवून पाहिला, पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, रात्री सव्वासातच्या सुमारास विशाल यांच्या सासू भाग्यश्री अरविंद जाधव यांनी त्यांना फोन करून, ‘रिशिका हीने एक फोटो व्हॉटसॲपवर पाठविला असून, त्यात घराच्या छताच्या ॲंगलला लाल रंगाची ओढणी बांधल्याचे दिसत असून, तुम्ही जाऊन पाहा,’ असे सांगितल्यानंतर विशाल व त्यांचा चुलत भाऊ उल्हास यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता रिशिका यांनी घराच्या छताच्या पत्र्याच्या ॲंगलला लाल रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, विशाल यांनी नातेवाइकांच्या मदतीने रिशिका यांना शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सहायक फौजदार आर. एस. साबळे करीत आहेत.