Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना साद घालताच भाजपमध्ये रूसवा? राज ठाकरेंच्या बंगल्याजवळ भाजपची बॅनरबाजी; फोटो व्हायरल
Saam TV April 21, 2025 09:45 PM

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंचीच चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार का? याच चर्चेनं जोर धरला आहे. युती होण्याचे तसे संकेतही दोन्ही नेत्यांकडून देण्यात आले आहे. अशातच मनसे आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दादरमध्ये भाजपकडून हिंदीभाषेच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलंय. त्यामुळे भाजप आणि मनसेमधील ठिणगीचे हे चित्र आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

खरंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांच्यासोबतची जवळीक वाढली होती. सत्तेतील नेते मंडळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घ्यायचे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीसाठी सत्तेतील मंडळीही थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घ्यायचे. या भेटीनंतर मनसे भाजपला टाळी देणार का? युतीमध्ये सामिल होणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

मात्र, आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ठिणगी पडणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात भाजपकडून हिंदीच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर भाजपकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

बॅनरवर 'ही नव्हे भाषेची सक्ती, ही आहे महाराष्ट्राची भक्ती', 'भाषा तोडत नाही, तर जोडते', अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

शेलारांकडून राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीबाबत मोठं विधान

मंत्री आशिष शेलार यांनी 'माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपलाय', असं शेलार यांनी राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीबाबत मोठं विधान केलं होतं. त्यामुळे भाजप आणि मनसेत मिठाचा खडा पडला आहे का? याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.