पिंपरी, ता. २२ : महापालिकेच्या ‘फ’ प्रभागातील रुपीनगर परिसरात विशेषतः श्रमिक सोसायटीत जुन्या व मोडकळीस आलेल्या जलनिस्सारण वाहिन्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घाणीने भरलेल्या वाहिन्या, दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन महिन्यांपूर्वी श्रमिक सोसायटीमधील नागरिकांनी अधिकृतपणे नवीन जलनिस्सारण वाहिनी टाकण्याबाबत ‘फ’ प्रभाग कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही फक्त तात्पुरते दुरुस्ती केली जाते. महापालिका सारथी हेल्पलाईनवर वारंवार फोन केल्यानंतर, ठेकेदाराचे कामगार येतात. काही वेळेस काम करतात आणि परत जातात. काही दिवसांत पुन्हा तीच समस्या उभी राहते. ‘फक्त आश्वासन नको, कृती हवी’ असे आवाहन श्रमिक सोसायटी आणि रुपीनगरमधील नागरिकांनी प्रशासनाला केले आहे.
‘‘आम्हाला त्रास होतोय. हे वारंवार सांगूनही दुर्लक्षच केले जात आहे. पाण्याची साचलेली घाण आणि दुर्गंधी यामुळे घरात बसणेही कठीण झाले आहे.’’
- प्रदीप गोरे, सदस्य, श्रमिक सोसायटी
प्रशासन कधी जागे होणार? रोज तात्पुरते उपाय करून वेळ मारून नेली जाते. नव्या जलनिस्सारण वाहिनीच्या कामाची त्वरित मंजुरी द्यावी. तात्पुरती दुरुस्ती थांबवून कायमस्वरूपी सोडवणूक करावी.’’
- सुरेश जाधव, ज्येष्ठ नागरिक
श्रमिक सोसायटीत एकत्र राहून आम्ही अर्ज केला. पण, तीन महिने उलटूनही निर्णय नाही. आमचा संयम संपत चालला आहे. श्रमिक सोसायटीसह पूर्ण रुपीनगरमध्ये जुन्या जलनिस्सारण वाहिनीचा संपूर्ण आढावा घ्यावा.
- योगेश सोनवणे, नागरिक
रुपीनगर परिसरातील श्रमिक सोसायटीतील समस्येबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल. जलनिस्सारणाच्या कामाची समस्या सोडविण्यासाठी सूचना करण्यात येतील.’’
- श्रीकांत कोळप, ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी
PNE25V08510