पुणे, ता. २२ : भारती अभिमत विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार यंदा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाच्या ३० व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी (ता. २६) विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि एक लाख रुपये असे असणार आहे. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगलप्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अमिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी दिली.