दिल्ली कॅपिट्ल्सने मंगळवारी 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्या घरच्याच मैदानात धुव्वा उडवला. दिल्लीने यासह आयपीएल 2025 मधील सहावा विजय मिळवला. केएल राहुल हा दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. केएलने आपल्या माजी संघाविरुद्ध नाबाद विजयी खेळी केली. केएलने या विजयानंतर त्याच्या माजी संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याकडे ऑन कॅमेरा दुर्लक्ष केलं. केएलने लखनौविरुद्ध केलेल्या खेळीमुळे दिल्लीने लखनौवर एकाना स्टेडियममध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे आता सोशल मीडियावर या सर्व प्रकाराची चर्चा रंगली आहे. तसेच केएल आणि गोयंका या दोघांचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.
दिल्लीच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू परंपरेप्रमाणे हस्तांदोलनासाठी मैदानात आले. संजीव गोयंका हस्तांदोलन झाल्यानंतर केएल राहुलचे अभिनंदन करण्यासाठी गेले. केएलनेही गोयंका यांच्यासह हस्तांदोलन केलं. त्यानंतर गोयंका यांनी केएलसह संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र केएलने गोयंका यांना दाद दिली नाही. केएलने गोयंका यांच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं आणि पद्धतशीर निघून गेला. गोयंका यांनी केएलसह काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण केएलने आपला वेळ वाया घालवला नाही. त्यानंतर केएल दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे संजीव गोयंका यांचा चेहरा पडला.
केएल राहुल हा 2022 ते 2024 दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. मात्र गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर संजीव गोयंका यांनी केएल राहुलला भर मैदानात झापलं होतं. त्यानंतर केएल आणि गोयंका यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली. इतकंच काय तर लखनौने केएलला करारमुक्तही केलं होतं. केएलच्या डोक्यात तेव्हापासून ही चिड होती. मात्र केएलने अखेर लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर अचूक परतफेड केली.
केएल राहुलकडून अचूक परतफेड!