पातूर - पातूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बळीराम तुळशीराम चव्हाण (वय-५३) यांना धमकावण्याचा प्रकार घडला असून, त्यासंबंधी पातूर पोलिसात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोला येथील सचिन निमकाळे याच्यावर ७ एप्रिल रोजी अवैध मुरूम वाहतुकीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यानंतर तो २१ एप्रिल रोजी दोन ते तीन साथीदारांसह पातूर तहसील कार्यालयात पोहोचला आणि थेट नायब तहसीलदार चव्हाण यांच्या दालनात घुसला.
त्यांनी शासकीय वाहनावरील चालक मुजाहिद खान याच्याबाबत चौकशी सुरू केली. यावेळी त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीने चव्हाण यांना एक मोबाईल देत सांगितले की, फोनवर अरविंद पाटील बोलणार आहेत.
फोन स्पीकरवर ठेवून अरविंद पाटील यांनी नायब तहसीलदारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याच दरम्यान त्यांनी गंभीर धमकी देत म्हटले, 'तू जर त्या चालकाला पुन्हा गाडीत पाहिलास तर तुमच्या कमरेत लाथा घालतो, तहसील कार्यालय आणि गाडी पेटवून देतो.'
त्यांनी चव्हाण व पातूरचे तहसीलदार यांच्याबाबतही अपमानास्पद वक्तव्य करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. विशेष म्हणजे, या घटनेचा ऑडिओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले, ज्यामुळे नायब तहसीलदार चव्हाण यांची बदनामी झाली.
या प्रकरणी नायब तहसीलदार चव्हाण यांनी आपल्या तक्रारीसह ऑडिओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेज यांसह पुरावा म्हणून पेन ड्राईव्ह पोलिसांकडे सादर केली आहे. त्यांनी अरविंद पाटील (रा. टाकळी खोजवळ, ता. बाळापूर), सचिन निमकाळे (रा. आसोला) व त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री अरविंद पाटील, सचिन निमकाळे आणि इतर अज्ञात साथीदारांविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 132, 296, 351(2), 351(3), 356(2), 3(5), 3(1)(r) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करत असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.