कुतूहल जागे ठेवूया!
esakal April 23, 2025 09:45 AM

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

‘Curiosity is the mother of all inventions.’

- Plato.

रट्टा मारून म्हणजेच घोकंपट्टी करून किंवा पाठांतर करून इंजिनिअर झालेल्या युवतीबद्दलचे कुतूहल कायम आहे. नेमके काय घडते आहे? काही चुकत तर नाही ना?आपल्यापैकी बहुतेकांना असे अनेक प्रश्न पडतच असतील ना? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण जिवापाड प्रयत्न करतच असतो. जन्मतः आपली पंचेद्रिये कार्यरत होतात.

तत्क्षणी कुतूहलाचा जन्म होतो. व्हायला पाहिजे. आता पोट भरलेले आहे. आपण आडवे असतो. एकच मिती दिसत असते. शरीरभान नसल्याने बाकी आजूबाजूचे काहीच दिसत नसते. अचानक डोळ्यांसमोर अत्यंत जवळ फक्त आपल्या हाताचा पंजा दिसू लागतो. काय आहे हे? पहिले, अगदी जवळचे, हेच कुतूहल असावे कदाचित.

मग ते बाळ उत्तर शोधण्याच्या एका अनावर उर्मीने तोंडात बोटे घालते. तेव्हढ्यात सजग म्हणवणाऱ्या, डोळ्यात तेल घालून पहारा करणाऱ्याला काहीतरी खटकते. लाडात येऊन जरबेने तो कुणीतरी ओरडतो, ‘तोंडी बोटे घालू नये’ आणि स्वतःच ती बोटे बाहेर काढतो. पहिल्या कुतूहलाचा असा अपमृत्यू होतो. आणि असे अनेक प्रश्न मनातच राहायला सुरुवात होते.

घोकून इंजिनिअर झालेल्या त्या एकट्याच युवतीला प्रश्न विचारण्यावाचून रोखले गेले नसणार. अनेक जणांचे अनेक प्रश्न असे अश्वत्थाम्याच्या भळभळणाऱ्या जखमेसारखे वाहत असतील. आणि वाहून जात असतील. कुतूहल शमले नाही तर, तुमच्यातील सर्जनशीलतेचा, कल्पकतेचा अंत होतो. सारे कसे एकसाची होऊन जाते.

कोणत्याही कार्यशाळेमध्ये बोलताना मी काही कोडी घालतो. ‘कोडी विचारू का?’ असे उच्चस्वरात विचारतो. ‘होयच्या बाजूने असलेल्यांनी हात वर करा.’ असे म्हटल्याबरोबर सगळे उजवा हात वर करतात आणि ओरडतात ‘यस्स सर’ मला शाळेत असल्याचा भास होतो.

‘उजवाच हात का वर केला?’ असे विचारल्यावर ‘सवय आहे. शाळेत असल्यापासूनचा आज्ञाधारकपणा.’ अशी उत्तरे येतात.

‘सर, कोणता हात वर करू?’ असे एकालाही विचारावेसे वाटत नाही. काय काय अंगवळणी पडलेले असते ना आपल्या? आमचे एक उद्योजक मित्र आहेत. जगभर कामानिमित्त फिरत असतात. त्यांना एकदा विचारले, ‘का हो, विकसित देशात एव्हढे शोध का लागतात?’

‘कारण ते श्रीमंत आहेत.’ ते तत्काळ उद्गारले. त्यांना प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे शोधायला तिकडे उद्युक्त केले जाते. तसे वातावरण मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विज्ञाननिष्ठा हा त्यांच्याकडे फक्त भाषणाचा विषय नाही.

मुख्य म्हणजे ती मंडळी अनुत्पादक गोष्टींमध्ये फार काळ अडकून पडत नाहीत. एक कार्य सिद्धीस गेले की ते तत्काळ पुढच्या कार्याची तयारी सुरू करतात. एकच एक यश आयुष्यभर चघळत बसत नाहीत. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. कुतुहलांबद्दल अजून थोडे पुढच्या भागात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.