59461
महामार्गलगतचे अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन
ठाकरे सेनेचा इशारा : कणकवलीत अभियंत्यांच्या उपस्थितीत बैठक
कणकवली, ता. २३ : राष्ट्रीय महामार्ग विभागाने बांदा ते खारेपाटण या सिंधुदुर्ग हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे ५ मे पर्यंत हटवावीत. तशी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात महामार्ग विभागाचे उपअभियंता अतुल शिवनीवार, अभियंता वृषाली पाटील, बी.जे. कुमावत आदींशी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत आदींनी चर्चा केली.
महामार्ग प्राधिकरणने अलीकडेच नांदगाव येथे स्टॉलवर कारवाई केली होती. ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आली होती, असा आरोप नांदगावातील मुस्लिम बांधव तसेच इतर स्टॉलधारकांनी केला. तर या कारवाईबाबत राजन तेली, परशुराम उपरकर, वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजकीय दबावापोटी व चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई करत असाल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अतिक्रमण काढणार असाल तर जिल्ह्यातील बांदा ते खारेपाटण पर्यंत महामार्ग दुतर्फा असलेले सर्वच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करा. दूजाभाव करून विशिष्ट व्यक्तींवर कारवाई करू नका,असेही यावेळी सांगण्यात आले.
सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले तर सध्या आवश्यक ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती महामार्ग अभियंत्यांनी दिली. दरम्यान, या चर्चेवेळी ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख मधुरा पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तेजस राणे, अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी मज्जीद बटवाले यांच्यासह अब्दूल नावलेकर, महम्मद नावलेकर, बकर नावलेकर, हुसेन नावलेकर, पिनाज नावलेकर, जासमिन नावलेकर, इम्रान नावलेकर आदी उपस्थित होते.
---
पारकरांकडून प्रश्नांची सरबत्ती
अनेक कामे आवश्यकता नसताना केली जात असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. या मिडलकटवरून वाहने वळताना सातत्याने अपघात होत आहेत. असे अपघात रोखण्यासाठी महामार्ग विभागाने कोणती उपाययोजना केली? असा प्रश्न परशूराम उपरकर यांनी केला. तर महामार्गावर किती ठिकाणी हेल्पलाईन नंबरचे फलक लावले आहेत. रुग्णवाहिकेची सेवा सुरू अद्याप सुरू का झाली नाही? हळवल फाटा येथे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या नाहीत? असे प्रश्न जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले. तर अपघात रोखण्यासाठी महामार्ग विभागाकडून उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही अभियंता श्री.शिवनिवार यांनी दिली.