भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
हिमांशी या त्यांच्या पत्नी असून हल्ल्यावेळी त्यांच्यासोबतच होत्या. पतीच्या मृतदेहाशेजारी बसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जग सुन्न झाले.
विनय हे हरियाणातील करनालचे रहिवासी होते. सात दिवसांपूर्वीच म्हणजे 16 एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता.
दोघेही हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते. 21 एप्रिलला ते जम्मू-काश्मीरात पोहचले होते. तर पहलगाम येथील हॉटेलमध्ये 22 एप्रिलला चेकइन केले होते.
हिमांशी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भेळपूरी खात असतानाच एक व्यक्ती आला आणि विनयकडे इशारा करत हा मुस्लिम नसल्याचे सांगत त्याच्यावर गोळी चालवल्याचे हिमांशी सांगतात.
विनय नरवाल यांचे पार्थिव बुधवारी दुपारी दिल्लीत आणण्यात आले. यावेळी नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. हिमांशीही यावेळी उपस्थित होत्या.
पतीला अखेरचा निरोप देताना हिमांशी यांनी जय हिंद म्हणत अखेरला सॅल्यूट केला. त्यांचा केवळ सहा दिवसांचा संसार होता.
विनय यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली होती. तीन वर्षांपूर्वीच ते नेव्हीच्या सेवेत दाखल झाले होते. सध्या केरळमध्ये त्यांची पोस्टिंग होती. लग्नासाठी त्यांनी सुटी घेतली होती.