Slum Fire : भीषण आगीत नव्वद झोपड्या जळाल्या; पंधरा सिलेंडरचे झाले स्फोट
esakal April 24, 2025 03:45 AM

वडगाव शेरी - चंदननगर येथे पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत येथील नव्वद झोपड्या जळून खाक झाल्या. आगीमुळे वस्तीतील विविध ठिकाणच्या पंधरा सिलेंडरचेही स्फोट झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केल्यामुळे अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात सुदैवाने आग पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

खराडी येथील चंदननगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या सुमारे सातशे घरांच्या दाट लोकवस्तीमध्ये पहाटे पाच वाजता आग लागली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि लोक गाढ झोपेत असल्यामुळे आग लागल्याचे पटकन लक्षात आले नाही.

आगीत सिलेंडरचा तसेच वस्तीत उभ्या असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे काही क्षणात आग वाऱ्यासारखी पसरली. काडी काडी जमवून उभारलेला संसार डोळ्यासमोर जळत असल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

शेजारील चंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वस्तीतील प्रत्येक घरातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. आगीबाबत माहिती कळताच येरवडा, धानोरी तसेच शहरातील इतर ठिकाणच्या अग्निशमन दलाची अकरा वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केल्यानंतर सुमारे तीन तासानंतर आग आटोक्यात आली.

चंदन नगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे म्हणाल्या, आगीत नव्वद झोपड्यांमधील गृह उपयोगी साहित्य जळाले. पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी आगी भोवतालच्या परिसरातील शंभर सिलेंडर बाहेर काढले. आगीत दोन व्यक्ती जखमी झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, प्रमोद सोनावणे, सुभाष जाधव, सोपान पवार व इतर सुमारे 80 जवानांनी आग नियंत्रणात आणली.

आगीमुळे गरीब कष्टकऱ्यांचे नव्वद संसार उघड्यावर आले आहेत. शेजारील एका हॉलमध्ये या रहिवाशांच्या राहण्याची आणि दहा दिवसांच्या अन्नपाण्याची सोय स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आता या रहिवाशांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी समाजातील दानशूर संस्था आणि व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन चंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.